मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात (बोरिवली) ‘वन्यप्राणी दत्तक योजना’ अंतर्गत बिबट्या (पँथर) दत्तक घेतला. सलग सात वर्षे बिबट्या दत्तक घेणारा पहिला केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
या उपक्रमात यावर्षी आठवले यांनी ‘सिंबा’ या बिबट्याला वर्षभरासाठी दत्तक घेतले असून त्यासाठी ₹१,२०,००० इतका निधी वनविभागाकडे सुपूर्त केला. दरवर्षी प्रमाणे यंदाही हा उपक्रम नियमितपणे सुरू ठेवत वन्यजीव संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.
आठवले यांचे वन्यजीवांवरील प्रेम हे त्यांच्या दलित पँथर चळवळीशी जोडलेले आहे. “मी मूळचा ‘दलित पँथर’ असून वन्य पँथरप्रमाणेच मी अन्यायाविरुद्ध झुंज देत आलो आहे. वन्यप्राणी आणि निसर्ग यांच्यावर प्रेम करणं ही आपली जबाबदारी आहे,” असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, दत्तक घेतलेल्या सिंबा या बिबट्याला आठवले यांचा आवाज ओळखू येतो, असं प्रत्यक्षदर्शी आणि कार्यक्रमाचे प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे यांनी सांगितलं. “ना. आठवले जेव्हा सिंबाला हाक मारतात, तेव्हा तो थांबतो आणि त्यांच्या दिशेने येतो – हे दृश्य नेत्रसुखद असून उपस्थित सर्वजण भारावून जातात,” असे रणपिसे म्हणाले.
कार्यक्रमावेळी ना. आठवले यांच्यासोबत पत्नी सौ. सीमा आठवले, पुत्र जीत आठवले, वनसंरक्षक संचालक अनिता पाटील, उपवनसंरक्षक रेवती कुलकर्णी, रिपाइंचे तालुका अध्यक्ष दिलीप व्हावळे, युवक आघाडीचे महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.