मुंबई : अगदी काल – परवापर्यंत ,“मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा,” असे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यातील वातावरण तापवणारे उद्योगपती सुशील केडिया शेवटी शनिवारी विविध प्रसार माध्यमांना मुलाखती देत अखेर झुकले. त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर माफी मागत आपली भूमिका मागे घेतली व म्हणाले “आता मी सुद्धा मराठी शिकणार,”…..!
मराठीच्या मुद्द्यावर आज दोन्ही ठाकरे बंधू जाहीरपणे मुंबईतील वरळीमधल्या एनएससीआय डोममध्ये एका व्यासपीठावर आले. यापुढेही आम्ही एकत्र काम करू, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जाहीर केल्याने काहीसे हादरलेल्या उद्योगपती सुशील केडिया यांनी तातडीने मराठीच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापुढे शरणागतीच पत्करली. केडिया म्हणाले की,“जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल, तर मी माफी मागतो.” मी नेहमीच राज ठाकरे यांचा आदर करत आलोय. त्यामुळे आता माझ्या वक्तव्यावरून बिघडलेले वातावरण चांगले करण्यासाठी आपण पुढे आले पाहिजे.”
नेमकं काय म्हणाले केडिया?
आता नेमकं केडिया म्हणाले “My heartfelt apologies to Raj Thackeray ji and Marathi speaking brothers & sisters if my words hurt anyone. Let’s work towards peace and harmony in society.”
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मराठी भाषा न शिकण्याच्या वक्तव्यावर केडियांचा खरपूस समाचार घेतला होता. त्यानंतर केडियांनी त्यांच्या पोस्टद्वारे शांततेचे आवाहन करत वाद शमवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. दरम्यान, आता केडियांच्या माफीवरही बऱ्याच नेटकऱ्यांच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी त्यांचे स्वागत केले आहे, तर काहींनी “उशिरा का होईना, जाग आली, अशा शब्दांत टोले लगावले आहेत.