मुंबई : पुणे महानगर प्रदेशाला (PMR) तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर नेण्यासाठी ते ग्रोथ हब म्हणून विकसित केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा तयार करणार असून पुणे महानगर विकास प्राधिकरण यासाठी निधीची तरतूद करणार आहे.
मंत्रालयात नीती आयोगाच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. त्यांनी सांगितले की, केंद्राच्या अर्थसंकल्पात देशभरातील १४ ग्रोथ हब शहरांच्या विकासाची घोषणा करण्यात आली असून त्यात महाराष्ट्रातील मुंबईनंतर आता पुणेचा समावेश करण्यात आला आहे. आयटी कंपन्या, उद्योग, मेट्रो, रिंगरोड, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालये यामुळे पुणे ग्रोथ हबसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे.
यशदा हे या प्रकल्पाचे आर्थिक धोरण व नियोजन आराखडा तयार करेल आणि त्यावर विभागीय आयुक्त लक्ष ठेवतील. यशदाचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर महापालिका, पीएमआरडीए आणि अन्य यंत्रणांनी अंमलबजावणी करावी.
पुण्याचे सकल उत्पन्न ४.२ लाख कोटी असून २०३० पर्यंत १५–१८ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. यातील किमान ६ लाख नोकऱ्या महिलांसाठी असतील. पुणे हे आर्थिक विकास आराखडा स्वीकारणारे देशातील पहिले शहर ठरणार आहे.
प्रमुख विकास घटकांमध्ये तंत्रज्ञान-नवप्रवर्तन, ई-वाहने, क्लीन टेक, सेमीकंडक्टर डिझाईन, औद्योगिक क्लस्टर्स (चाकण, तळेगाव, रांजणगाव), उच्च शिक्षण संस्था, स्मार्ट टाउनशिप, वारसा-आध्यात्मिक-शेती पर्यटन, स्टार्टअप आणि परकीय गुंतवणुकीस पोषक सुधारणा यांचा समावेश आहे.
लवकरच यशदा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित यंत्रणांची बैठक होणार आहे.