महाड –कोकणातील गणेशोत्सव अवघ्या ३० दिवसांवर येऊन ठेपला असतानाही मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील खड्डे आणि वाहतूक कोंडी कोकणवासीयांची डोकेदुखी ठरली आहे. रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे १५ ऑगस्टपर्यंत न सुधारल्यास ‘चक्काजाम’ आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.
महामार्गाचे काम १८ वर्षांपासून सुरू असूनही अजूनही पूर्ण झालेले नाही. “खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा?” हा प्रश्न प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. पेण–नागोठणे टप्प्यातील अनेक भागांत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असून, वाहतूक कोंडी, अपघात आणि प्रवाशांचा त्रास वाढत आहे.
सुभाष मोरे यांनी उपस्थित केले की, रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी या महामार्गाच्या दुरुस्तीविषयी ना विधानसभेत आवाज उठवला, ना लोकसभेत. “सिंधुदुर्गातील रस्त्यांची अवस्था सुधारली, पण रायगड आणि रत्नागिरी मात्र दुर्लक्षित राहिले,” असा आरोप त्यांनी केला.
मागील वर्षीही माणगाव येथे जनआक्रोश समितीने उपोषण केले होते, पण तत्कालीन पालकमंत्री उदय सामंत चर्चेला न येता पलायन केल्याचा आरोपही त्यांनी केला.
आगामी गणेशोत्सवात ५,००० एसटी बस व ३,००० हून अधिक खासगी वाहने महामार्गावर धावणार असताना, माणगाव, इंदापूर, नागोठणे, कोलाड येथे खड्डे व अपूर्ण कामांमुळे प्रवास त्रासदायक ठरणार आहे.
महामार्गावर अद्यापही काही उड्डाणपुलांची ४०% कामे अपूर्ण आहेत. सुकळी खिंड, चांढेवे व लोटे येथील टोलनाके मात्र तयार असून, लवकरच टोलवसुली सुरू होणार असल्याचे संकेत आहेत.
“काम पूर्ण होण्याआधी टोल आणि पोलीस वसुली सुरु, पण जबाबदारी घेणारे कोणीच नाही,” असा सवाल स्थानिक नागरिक व वाहतूकदार उपस्थित करत आहेत.