मुंबई : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ हा कायदा लोकशाहीला बाधा आणणारा आणि नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे—असा जाहीर हल्लाबोल करत, विरोधकांनी आता निर्णायक लढ्याची हाक दिली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, १४ ऑगस्ट रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘निर्धार परिषद’ भरवली जाणार असून, यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा होणार आहे.
राजकारणातील दिग्गज आणि जनआंदोलनातील नामवंत नेते या मंचावर एकत्र येणार आहेत. महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे, माजी खासदार हर्षवर्धन सपकाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत. त्यांच्यासोबत पी. साईनाथ, किरण माने, सुरेश खोपडे, संभाजी भगत, प्रज्ञा पवार, तुषार गांधी, ॲड. मिहिर देसाई, तिस्ता सेटलवाड, दीपक पवार, मिलिंद रानडे, डॉ. डी. एल. कराड, आनंद पटवर्धन आणि धनाजी गुरव यांसारखी मान्यवरांची फळी मांडणी करणार आहे.
विरोधाची ठिणगी आणि संतापाची लाट
या विधेयकाविरोधात यापूर्वीच राज्यभर संतापाची लाट उसळली होती. २२ एप्रिल रोजी ७८ तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे निदर्शने झाली, तर ३० जून रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदानावर विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून तब्बल १३,००० हरकती दाखल झाल्या, त्यापैकी ९,५०० हरकतींमध्ये “विधेयक रद्द करा” ही ठाम मागणी होती. एवढ्या प्रचंड विरोधानंतरही सरकारने या हरकतींना केराची टोपली दाखवून, लोकांना प्रत्यक्ष मांडणीची संधी न देता, दोन्ही सभागृहात बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर केले.
काय आहे आरोप?
संघर्ष समितीचा आरोप आहे की, हा कायदा सत्ताधाऱ्यांना अमर्याद अधिकार देतो, विरोधकांचा आवाज दडपतो आणि जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणतो. “हा कायदा लोकशाही तत्त्वांना मारक आहे, त्यामुळे आता लढाई रस्त्यावर उतरून होणार,” असे आयोजकांनी जाहीर केले.
मोर्चा आता मुंबईकडे
१४ ऑगस्ट रोजी दुपारी १ ते ५ या वेळेत होणाऱ्या ‘निर्धार परिषदेत’ विविध क्षेत्रातील नेते, साहित्यिक, पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि कलाकार एकाच व्यासपीठावरून सरकारविरोधी रणशिंग फुंकणार आहेत.
सुभाष लांडे, प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, उल्का महाजन, ब्रायन लोबो, कॉ. भारत पाटणकर, किशोर ढमाले, आमदार विनोद निकोले, अजित नवले, बाळाराम पाटील, उदय भट, शाम गायकवाड, अबू आझमी, डॉ. भालचंद्र कांगो यांचाही यात सहभाग असेल.
आवाहन
भाकप, माकप, शेकाप, भाकप माले, समाजवादी पक्ष, सकप, भारिप (से), भारत जोडो अभियान, श्रमिक मुक्ती दल आणि जनआंदोलनाची संघर्ष समिती यांनी नागरिकांना आवाहन केले आहे— “आपण स्वतः किंवा आपले प्रतिनिधी या परिषदेतील या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा. हा लढा तुमच्यासाठी आहे.”