मुंबई: देशात “टेरीफ वॉर” सुरू असतानाही गणेशोत्सवाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्रात तब्बल ₹३३,७६८ कोटी ८९ लाखांची नवी गुंतवणूक झाली असून, यातून ३३,४८३ रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.
सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री फडणवीस व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत १७ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. फडणवीस म्हणाले, “देशभरातील परिस्थिती पाहता महाराष्ट्राला एवढ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणे हा गुंतवणूकदारांचा विश्वास दाखवतो.”
गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सोलार, इलेक्ट्रिक बसेस व ट्रक्स, संरक्षण क्षेत्र अशा विविध क्षेत्रांचा समावेश असून, उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ आणि कोकणमध्ये उद्योग उभारणीच्या संधी निर्माण होणार आहेत.
फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करार स्वाक्षरीवर थांबणार नाही, तर प्रत्येक टप्प्यावर शासन भागीदार म्हणून सोबत राहील. कुठेही अडथळा येणार नाही.”
त्यांनी मैत्री पोर्टल या वन-स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख करत उद्योगांना जमीन, परवानग्या व मंजुरी तत्काळ देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. ऊर्जाविषयक निर्णयांचा उल्लेख करताना ते म्हणाले, “राज्यात नुकताच ५ वर्षांचा मल्टी-इयर टॅरिफ मंजूर झाला असून विजेचे दर वर्षागणिक कमी होतील. पूर्वी दरवर्षी ९% वाढ होत असे, पण आता उलट दर कमी होणार आहेत. हे उद्योगांसाठी मोठे दिलासादायक ठरेल.”
“उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचा जीवनचक्र राज्य सरकार स्थिर व अंदाजपत्रित ठेवण्याच्या धोरणावर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल,” असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.