मुंबई: मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयात काही वाक्ये आणि शब्दांबद्दल संभ्रम आहे. याबाबत आम्ही ज्येष्ठ विधीज्ञांशी सविस्तर चर्चा करत आहोत. गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ओबीसी समाजाने आंदोलने (Protest by OBC) व उपोषणे तूर्त स्थगित करावीत, असे आवाहन राज्याचे मंत्री व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “सरकारच्या शासन निर्णयावर आम्ही वकिलांशी सखोल चर्चा करत आहोत. जर या निर्णयामुळे ओबीसी (OBC) घटकाचे नुकसान होत असल्याचे मत विधीज्ञांनी मांडले, तर मोठ्या आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारू. तसेच गरज पडल्यास न्यायालयातही दाद मागू.”
आज राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी संघटनांनी निदर्शने केली असून शासन निर्णयाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या भावना लक्षात घेऊन आणि विधीज्ञांशी चर्चा करून योग्य तो मार्ग निघेल, असा ठाम विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला.