मुंबई – भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याच्या उद्दिष्टपूर्तीत महाराष्ट्राचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे अशा महत्वाकांक्षी पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर गतिमान प्रवास करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले.
प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री शिंदे यांची मुक्तागिरी निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामे व महत्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती दिली.
या भेटीवेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, तसेच भारतीय विदेश सेवेतील योजना पटेल, प्रतिभा पारकर-राजाराम, परमिता त्रिपाठी, अंकन बॅनर्जी, स्मिता पंत, बिश्वदीप डे, सी. सुगंध राजाराम आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाचे समन्वयक म्हणून यशदाचे उपमहासंचालक त्रिगुण कुलकर्णी उपस्थित होते.
महाराष्ट्र देशाचे ग्रोथ सेंटर असल्याचे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील औद्योगिक विस्तार, परकीय गुंतवणूक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला. “महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या विकासाला गती देत आहेत,” असे ते म्हणाले.
तसेच आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यटन आणि गृहनिर्माण या क्षेत्रांत महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचा उल्लेख त्यांनी केला. “मुंबईत परवडणारी घरांची निर्मिती करून सामान्य नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण होत आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील हिवाळी गावातील शाळा, त्यातील विद्यार्थी आणि शिक्षक यांचे कौतुक केले. या शाळेला आवर्जून भेट द्यावी, अशी सूचना त्यांनी शिष्टमंडळाला केली.