मुंबई –उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. इतकेच नव्हे, तर यापुढे मोठ्या आंदोलनांची ठिकाणे दक्षिण मुंबईऐवजी इतरत्र हलवावीत, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
देवरांनी पत्रात म्हटले आहे की, “दक्षिण मुंबई हे शासन, सुरक्षा आणि अर्थकारणाचे प्रमुख केंद्र आहे. येथे मंत्रालय, विधीमंडळ, मुंबई महापालिका मुख्यालय, राज्य व मुंबई पोलिस दलाचे मुख्यालय, वेस्टर्न नेव्हल कमांड तसेच जे.जे., सेंट जॉर्ज आणि कामा यांसारखी प्रमुख रुग्णालये आहेत. अशा पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत होणाऱ्या मोठ्या आंदोलनांमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येतो तसेच शासन, सुरक्षा व खासगी क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम होतो. त्यामुळे आंदोलने इतरत्र हलविणे गरजेचे आहे.”
या पत्रामुळे मराठा संघटनांत तीव्र नाराजी उसळली आहे. मराठी एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले, “बाप बदलला की विचार बदलत नाहीत. मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील मुरली देवरा दोघांचेही विचार मराठीद्वेष्टे होते. त्यामुळे त्यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच जाहीर होळी झाली पाहिजे.”
काही मराठा संघटनांचे म्हणणे आहे की, आंदोलने हा लोकशाहीतील मूलभूत हक्क असून त्यावर कुठलेही निर्बंध घालणे म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे आहे.
आता या वादग्रस्त पत्राच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.