मुंबई – थेट परदेशी गुंतवणुकीत (FDI) यावर्षी एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत कर्नाटक आघाडीवर असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. फडणवीस सरकारपूर्वीही कर्नाटक एकदा पुढे गेले होते. “यशाचे श्रेय घेण्यासाठी फडणवीस पुढे येतात, तर अपश्रेयही स्वीकारले पाहिजे,” अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
सावंत म्हणाले की, “महाविकास आघाडी सरकार असताना केंद्राने कम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर क्षेत्रातील मोठी गुंतवणूक जाणूनबुजून गुजरातला वळवली. त्यावेळी फडणवीस सरकारवर टीका करत होते. पण आता त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येच महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.”
ते पुढे म्हणाले, “या तिमाहीतील सर्वाधिक परदेशी गुंतवणूक देशात कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात झाली असून त्यातील बहुतांश हिस्सा कर्नाटकला गेला आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट देऊन ‘आपले आयटी पार्क बंगळुरूकडे चालले आहे’ असे विधान केले होते. आता तेच सत्य ठरत आहे.”