मुंबई : सांताक्रूझ येथील बी.एन. देसाई रुग्णालयासह मुंबईतील काही रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात बोगस डॉक्टर नेमण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ करणाऱ्या या गंभीर गैरप्रकाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र भूमिका घेतली आहे.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व युवक काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी बृहन्मुंबई महापालिका आयुक्त (आरोग्य विभाग) यांना ई-मेलद्वारे अधिकृत पत्र पाठवून संबंधित कंत्राटदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ॲड. मातेले यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, कंत्राटदाराने रुग्णालयात बोगस डॉक्टर नेमून केवळ आर्थिक फायदा मिळवला नसून रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ केला आहे. त्यामुळे त्याच्यावर खालील भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे :
• कलम 420 : फसवणूक
• कलम 406 : विश्वासभंग
• कलम 468 : फसवणुकीसाठी कागदपत्रांची बनावट निर्मिती
• कलम 471 : बनावट कागदपत्रांचा वापर
• कलम 304A : निष्काळजीपणामुळे मृत्यू/अपाय
• कलम 336, 337, 338 : जीव धोक्यात घालणे व दुखापत करणे
• कलम 120B : गुन्हेगारी कट
तसेच या कंत्राटदाराला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकून भविष्यात कोणतेही कंत्राट न देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल न झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना घेराव घालून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ॲड. मातेले यांनी दिला आहे.
या प्रकरणी महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय इतका मोठा गैरप्रकार होणे शक्य नसल्याचे ॲड. मातेले यांनी नमूद केले आहे. त्यामुळे सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, हीच खरी जनतेच्या आरोग्याची हमी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“मुंबईकरांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बोगस डॉक्टर प्रकरणी आम्ही मूकदर्शक राहणार नाही. दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील,” असे ॲड. अमोल मातेले यांनी ठामपणे सांगितले.