मुंबई– मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. सत्ता समीकरणं, आगामी निवडणुकीच्या हालचाली आणि पक्षातील आतल्या गोटातील चर्चांनी वातावरण तापवलं आहे. यामध्येच उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने अचानक मुंबईतील विभागप्रमुखांना मातोश्रीवर बोलावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्व मोठ्या पक्षांत चर्चा सुरू आहेत. कोण कुणासोबत जाणार, कोणावर विश्वास, कोणावर हल्ला – या समीकरणात आता ठाकरे गटाने केलेली हालचाल विरोधकांमध्ये कुजबुज निर्माण करणारी ठरली आहे. त्यामुळेच या बैठकीत नेमकं कोणत्या मुद्द्यांवर रणनीती आखली जात आहे याबाबत तर्कवितर्क रंगले आहेत.
मुंबई नेहमीच राजकीय दृष्ट्या निर्णायक ठरलेली आहे. इथल्या निवडणुकांवर राज्यातील सत्तेची दिशा ठरते, असं अनेकदा सिद्ध झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या या बैठकीत कोणते निर्णय होतील, कोणाला कोणती जबाबदारी मिळेल, आणि निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माहितीनुसार, संघटन मजबूत करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणनितीबाबत सविस्तर चर्चा झाल्याचेही समजते. यामुळे ठाकरे गटाने निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीने तयारी सुरू केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.