महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : महाडचा नाला झाला ‘कचराकुंडी’ – नगरपालिकेच्या आळशी कारभारावर नागरिकांचा संताप!

महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावरच असणारा बालाजी मंदिर ते डोंगरी पूल नाला आज भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या कचऱ्याने अक्षरशः भरून वाहत आहे. नगरपालिकेच्या दुर्लक्षित कारभारामुळे या नाल्याला कचराकुंडीचे रूप आले असून, रहिवाशांचा संताप वाढला आहे.

नाल्यात टाकला जाणारा भाजी–फळांचा कचरा

महाड शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भगवानदास बेकरी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या ठिकाणी भाजी व फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक कोंडी ही कायमची समस्या आहे. त्यातच या विक्रेत्यांचा खराब माल व नासधूस झालेला भाजी–फळांचा कचरा बालाजी मंदिर–डोंगरी पूल नाल्यात बिनधास्तपणे टाकला जातो. परिणामी हा नाला नियमितपणे कचऱ्याने गच्च भरलेला दिसतो.

कचरा गाड्या असूनही दुर्लक्ष

महाड परिषदेच्या वतीने कचरा संकलनासाठी गाड्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या गाड्या दिवसातून तीन ते चार वेळा फिरून रहिवासी, भाजी मंडई, मच्छी–मटण विक्रेते व हॉटेल व्यवसायिकांचा कचरा गोळा करतात. मात्र, शिवाजी चौक ते बालाजी मंदिर परिसरातील विक्रेते नगरपालिकेच्या गाड्यांऐवजी थेट नाल्यातच कचरा फेकतात. त्यामुळे नगरपालिका रोज खर्च करून साफसफाई करत असली तरी स्थिती जैसे थेच राहते.

नगरपालिकेची भूमिका आणि नागरिकांचा आक्रोश

या संदर्भात नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय कोळेकर यांच्याशी संपर्क साधला असता, ते अलिबाग येथे शासकीय कामासाठी गेले असल्याने अनुपस्थित होते. मात्र त्यांनी, “या प्रकरणी मी तातडीने कार्यवाही सुरू करतो,” असे सांगितले. तरीही नागरिकांच्या मते, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे परिस्थिती रोज तीच तीच राहते.

नागरिकांचे म्हणणे आहे की, विक्रेत्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शहरवासीयांना त्रास सहन करावा लागतोच, पण त्यांच्याकडून मिळणारा कर अत्यल्प असताना स्वच्छतेवर दुप्पट–तिप्पट खर्च नगरपालिकेला करावा लागतो. त्यामुळे या भाजी–फळ विक्रेत्यांवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक असल्याची मागणी शहरातून होत आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात