महाड – रायगड जिल्ह्यातील महाड येथे ८३ वा हुतात्मा दिन बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी नगरविकास खात्यामार्फत हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केल्याची घोषणा केली.
माजी नगराध्यक्ष स्नेहल माणिकराव जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले की, “या पंचवीरांचा पुस्तकरूपी इतिहास प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे. हुतात्मा दिन हा महाडचा उत्सव म्हणून साजरा करण्याचा आपला संकल्प आहे.”
सन १९४२ मध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या किसान मोर्चात शहीद झालेले हुतात्मे कमलाकर दांडेकर, नथू टेकावले, विठ्ठल बिरवाडकर, अर्जुन भोई यांच्यासह क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित व इतर क्रांतिवीरांना अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी समितीमार्फत दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
यंदाही सकाळी शाळा क्र. ४ मधील कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थी सहभागी झाले. वीर हुतात्म्यांना अभिवादन करून शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीनंतर स्मारकातील तसबिरींना पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर राजीप शाळा वलंगचे शिक्षक गंगाधर साळवी आणि कोएसो महाड शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पोवाड्यांचे सादरीकरण करून मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात नितीन पावले यांनी स्मारकाच्या सुशोभीकरणाबरोबरच पंचवीरांचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याची मागणी केली. त्यास आमदार गोगावले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत समितीची बैठक लवकरच आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे केली तर काहींनी दहशतवाद तसेच शहीदांच्या बलिदानावर प्रभावी विचार मांडले. त्यांच्या ओजस्वी वक्तव्यांनी वातावरण भारावून गेले. यापूर्वी पंचायत समिती महाड येथे घेतलेल्या वक्तृत्व व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यावेळी तहसीलदार महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर भुस्कुटे, पोलीस निरीक्षक रमेश तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार व समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण बाळ यांनी केले.
देशभक्तीच्या घोषणांनी व हुतात्म्यांच्या स्मृतींनी भारलेल्या वातावरणात यंदाचा महाडचा ८३ वा हुतात्मा दिन अविस्मरणीय ठरला.