मुंबई – “मंत्रालयालाच पाण्याचा पुरवठा बंद झाला तर मग सामान्य मुंबईकरांनी काय अपेक्षा ठेवायची?” – शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता मंत्रालय व आसपासच्या शासकीय इमारतींचा पाणीपुरवठा अचानक बंद झाला आणि गोंधळ उडाला. मंत्रालयाच्या सुरक्षेवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह, आमदार निवासातील कर्मचारी व कार्यकर्त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली.
मंत्रालय व विधानभवन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार भूमिगत वाहिन्यांपैकी एक वाहिनी दुपारी फुटली. पाणीपुरवठा सुरू असतानाच दाब आल्याने काँक्रिट रस्त्याला मोठा तडा गेला. याची खबर लागताच मनपा पाणीपुरवठा विभाग व रस्ते विकास विभागाचे अधिकारी, अभियंते घटनास्थळी दाखल झाले. अत्याधुनिक यंत्रसामग्रीने रस्ता खोदून दुरुस्ती सुरू करण्यात आली. वाहतूक विभागाने गिरगाव चौपाटीकडे जाणारा मार्ग तातडीने बंद केला.
दिवसभर कार्यालयीन कामकाज सुरू असल्याने ५.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात आला. पण काम युद्धपातळीवर करणे भाग पडल्याने संध्याकाळी ७.३० वाजता मंत्रालय, प्रशासकीय भवन, मंत्र्यांचे बंगले, आकाशवाणी केंद्र आणि आमदार निवास यांचा पुरवठा थेट बंद करण्यात आला.
महायुती सरकारचे बहुतांश मंत्री गुरुवार-शुक्रवारी मंत्रालयात कमीच वावरत असल्याने त्यांच्या बंगल्यांवर वाळवंटासारखी शांतता असते. मात्र पाणीपुरवठा बंद होताच येथे राहणारे कर्मचारी व बाहेरगावाहून आलेले कार्यकर्ते धावपळीत पडले. सर्वाधिक त्रास झाला तो रात्रपाळीतील सुरक्षारक्षकांना.
मनपा प्रशासनाने दाखवलेली तत्परता प्रशंसनीय असली तरी तीच तत्परता जर सर्वसामान्य मुंबईकरांच्या भागात दाखवली तर नागरिक प्रशासनाला नक्कीच दुवा देतील, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. दुरुस्तीचे काम मध्यरात्रीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मनपाने दिली.