मुंबई : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकणातील प्रभावी नेते वैभव खेडेकर हे २३ सप्टेंबर रोजी भाजपा प्रवेश करणार असून, या प्रवेशाने दापोली मतदारसंघातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतच नव्हे तर भविष्यातील विधानसभा समीकरणातही या प्रवेशामुळे शिंदे गटात धाकधूक वाढली आहे.
प्रदेशाध्यक्षपदी कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागल्यानंतर भाजपाने रत्नागिरी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच चिपळूणमधील पराभूत उमेदवार प्रशांत यादव यांना पक्षात घेतल्यानंतर, भाजपाने आता शिंदे गटाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांच्या दापोली बालेकिल्ल्यात वैभव खेडेकरांना एंट्री देत थेट झुंज उभी केली आहे.
एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना सर्व पातळीवर मजबूत होती. मात्र २०२२ मधील फुटीनंतर शिंदे गटाने बालेकिल्ले हस्तगत केले, तर उद्धव ठाकरे गट फक्त गुहागरपुरता मर्यादित राहिला. आता भाजपाच्या नव्या खेळीमुळे शिंदे गटाच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.
वैभव खेडेकरांच्या प्रवेशाने मनसेने कोकणातील आपला सर्वात प्रभावी स्थानिक नेता गमावला आहे. खेड नगरपरिषदेवर स्वतंत्र झेंडा फडकविणारा मनसेचा हा चेहरा भाजपात गेल्याने रत्नागिरीत मनसेचे अस्तित्व संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
खेड-दापोली मतदारसंघात दशकानुदशके वर्चस्व गाजवणाऱ्या कदम कुटुंबीयांना आव्हान देण्यासाठीच खेडेकरांची एंट्री असल्याचे बोलले जात आहे. २०२९ मध्ये दापोलीतून खेडेकर विधानसभा गाठतील, अशी चर्चा गावागावांत रंगू लागली आहे.
४ सप्टेंबरला मुंबईत भव्य प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. मात्र मराठा–ओबीसी आंदोलनामुळे तो पुढे ढकलण्यात आला. अखेर २३ सप्टेंबर, नवरात्रीच्या दुसऱ्या-तिसऱ्या माळेला खेडेकरांचा पक्षप्रवेश होणार असून, याच दिवशी भाजपाची कोकण मोहिम नव्या जोरात सुरू होईल.