पोस्टमनलाही दरवाजाखालून टपाल टाकावे लागले!
महाड : महाड तालुक्यात गावोगावी अवैध दारू विक्रीचा पूर उसळला असताना, यावर कारवाई करणे तर दूरच, महाड शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला आज अक्षरशः टाळे लागलेले आढळले. इतकेच नव्हे तर शासकीय टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनलाही बुचकळ्यात पडत दरवाजा खालून पत्रे ढकलून जावे लागले.
महाड तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला असून, मुंबई–गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे मार्गामुळे येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. शहरात केवळ दोन अधिकृत वाईन शॉप असूनही, त्यांच्याच माध्यमातून गावोगावी अवैध दारू पोहोचवण्याचा खुला बाजार सुरू आहे.

परवान्याशिवाय दारू विक्री करणाऱ्या टोळ्यांचे साम्राज्य खेडोपाडी पसरले असून, तरुणाई मोठ्या प्रमाणावर मध्याच्या आहारी जात आहे. मात्र उत्पादन शुल्क विभाग मात्र डोळेझाक करून बसल्याचे चित्र जनतेसमोर उघड होत आहे.
महाड शहरातील नवे नगर येथे असलेले राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कार्यालय आज पूर्णपणे बंद होते. शासकीय कार्यालयाला टाळे पाहून सामान्य नागरिकांपासून ते पोस्टमनपर्यंत सगळेच चकित झाले.
शासकीय पत्रे सुपूर्द करण्यास कोणी अधिकारी वा कर्मचारी मिळाला नाही. परिणामी पोस्टमनने बंद दरवाज्याच्या खालून पत्रे टाकून आपली औपचारिकता पूर्ण केली.
हा प्रकार पाहून एकच प्रश्न उपस्थित झाला – “राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गेले तरी नेमके कुठे?”
अजितदादांनाच सवाल
राज्यात उत्पादन शुल्क मंत्री आणि उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडेच आता थेट बोट दाखवले जात आहे. दारूच्या अड्ड्यांचा पूर असूनही अधिकारी गायब, कार्यालयाला कुलूप आणि कारवाईला शून्य प्रतिसाद – हा संपूर्ण कारभार अजितदादांच्या नजरेतून सुटला आहे का? असा जळजळीत सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.