ग्रामीण रुग्णालयात रेबीज लसच नाही
महाड : महाड तालुक्यातील कुर्ला गायकरवाडी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने गावकऱ्यांवर हल्ला चढवून चार जणांना गंभीर जखमी केले. मात्र, महाड ग्रामीण रुग्णालयात प्रतिबंधात्मक रेबीज लस उपलब्ध नसल्याने तिघा गंभीर जखमींना तब्बल ३० किलोमीटर दूर असलेल्या माणगाव ग्रामीण रुग्णालयात हलवावे लागले. यामुळे महाड ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या हल्ल्यात धोंडू तांबडे, सनी खेडेकर, मालती पवार आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमींना प्रथम महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तेथे लसच उपलब्ध नसल्याने, शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांच्या मदतीने जखमींना तातडीने माणगाव रुग्णालयात रवाना करण्यात आले. हा प्रकार शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास घडला.
या घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. केवळ रुग्णालयांच्या इमारती उभारण्याचे काम दाखवायचे, पण प्रत्यक्षात औषधसाठा आणि आवश्यक उपचार साधनांकडे दुर्लक्ष करायचे, अशी गंभीर टीका नागरिकांनी केली आहे. आरोग्य यंत्रणेचा श्वास ‘सलाईन’वर चालल्याचे वास्तव या प्रकारातून पुन्हा एकदा समोर आले आहे.