मुंबई: राज्यातील लोकनाट्य व तमाशा या नावांचा संगीतबारी कला केंद्रांसाठी वापर होऊ नये, या तमाशा कलावंत संघटनेच्या मागणीचा प्रस्ताव यापूर्वी स्थापन केलेल्या समितीकडे पाठविण्यात येईल. तसेच या समितीने कलाकेंद्र व तमाशा यांच्या नावात बदल सुचविण्याबाबतचा निर्णय पुढील १५ दिवसांत द्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी दिले.
तमाशा कलावंतांच्या विविध प्रश्नांसंदर्भात प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे झालेल्या बैठकीत शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, गृह विभागाचे उपसचिव अ. नि. साखरकर, अवर सचिव बाळासाहेब सावंत, अखिल भारतीय लोककलावंत मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष संभाजीराजे जाधव आदी उपस्थित होते.
शेलार यांनी सांगितले की, तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारींच्या निवारणासाठी आधीच दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. आता या समित्यांची कार्यकक्षा वाढवून नावबदलाचा विषयही त्यांच्या जबाबदारीत सोपविला जाईल. तसेच गावोगावी कला सादर करण्यासाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांबाबतही उपाययोजना सुचवून पुढील १५ दिवसांत अहवाल द्यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.