महाड: कोकणात ६ मे २०२५ पासून सुरू झालेला पावसाळा सप्टेंबर अखेर येऊन ठेपला तरीही पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यातच हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता वर्तवली असून, या तीन दिवसांत कोकणात अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. राज्य सरकारने महसूल विभागाच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शेतकरी हवालदिल
सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या पावसामुळे भात पिकांचे, जनावरांच्या गोठ्यांचे, रस्त्यांचे व खाजगी जमिनींचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक वाया जाण्याच्या स्थितीत आल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.

जिल्हानिहाय इशारा
हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अतिवृष्टीची शक्यता वर्तवून इशारा दिला आहे. या काळात स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती व नागरिकांनी सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भूस्खलनाचा धोका
महाड तालुका व कोकणातील अनेक गावे डोंगराळ व दुर्गम भागात असल्याने अतिवृष्टीमुळे भूस्खलन व दरडी कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः महाबळेश्वर घाट, ताम्हिणी घाट, भोर घाट आणि स्थानिक घाटरस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्याची शक्यता आहे.
शनिवार-रविवार सुट्टी आणि नवरात्रोत्सव
२७ सप्टेंबर शनिवार व २८ सप्टेंबर रविवार सुट्टी असल्याने तसेच नवरात्रोत्सवाची तयारी सुरू असल्याने अनेक कर्मचारी प्रत्यक्षात अलर्ट मोडवर कार्यरत राहतील का, याबद्दल शंका व्यक्त होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर शासकीय यंत्रणा खरोखर किती दक्ष राहतात, हे अतिवृष्टी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
शाळांना सुट्टी जाहीर होणार का?
२७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा असला तरी २७ सप्टेंबर शनिवार व २९ सप्टेंबर सोमवार या दिवशी शाळा-महाविद्यालय सुरू राहणार आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी व शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांना आगाऊ सुट्टी जाहीर करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.