मुंबई: राज्यात सरासरीपेक्षा दुप्पट–तिप्पट पाऊस पडून ३० जिल्हे आणि जवळपास ३०० तालुके अतिवृष्टीग्रस्त झाले आहेत. सुमारे १४३ लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार झोपेत असल्याचा आरोप करत, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार तर जमीन खरडून गेलेल्यांना हेक्टरी ₹५ लाख तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज टिळक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
”शेतकऱ्यांच्या वेदना सरकारला दिसत नाहीत”
सपकाळ म्हणाले, “महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. मंत्रिमंडळ बैठकीत फक्त कोरडी चर्चा होते, पालकमंत्र्यांना जिल्ह्यांचा दौरा करायला सांगावे लागते, हे दुर्दैवी आहे. मराठवाडा व विदर्भात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पिकं, जनावरं, घरगुती साहित्य वाहून गेले तरी सरकार बहिरं, आंधळं आणि मुकं आहे.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? काँग्रेसच्या काळात गारपीट, चक्रीवादळ किंवा रोगराईमुळे नुकसान झाले की तातडीने मदत दिली जात होती. पण भाजप-शिंदे सरकार पंचनाम्याच्या कागदी अटींमध्ये शेतकऱ्यांना अडकवत आहे.”
काँग्रेस नेते शेतकऱ्यांच्या बांधावर
काँग्रेसने पूरग्रस्त भाग पाहणीसाठी पथके नेमली आहेत. छत्रपती संभाजीनगर-जालना येथे खासदार डॉ. कल्याण काळे, अनिल पटेल, राजेंद्र राख, राजेश राठोड, लातूर-बीड-धाराशिवमध्ये डॉ. शिवाजीराव काळगे, अशोक पाटील, दादासाहेब मुंडे, नांदेड-परभणी-हिंगोलीत रविंद्र चव्हाण, डॉ. प्रज्ञा सातव, अमरावतीत माणिकराव ठाकरे, यशोमती ठाकूर, नागपूर विभागात नामदेव किरसान, प्रशांत पडोळे, उत्तर महाराष्ट्रात शोभा बच्छाव, गोवाल पाडवी, तर सोलापूर जिल्ह्यात प्रणिती शिंदे यांसारखे नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतील, अशी माहिती सपकाळ यांनी दिली.
डोंबिवलीत दलित काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण
पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी आणखी एका गंभीर घटनेचा उल्लेख केला. “डोंबिवलीत भाजपाच्या गुंडांनी ७२ वर्षीय दलित काँग्रेस कार्यकर्त्याला डॉक्टरकडे जाताना अडवून जातीवाचक शिवीगाळ केली. या गुंडांवर खून, बलात्कारासारखे २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. भाजप अशा गुंडांना पाळते. जर त्यांच्यावर तातडीने कारवाई केली नाही तर काँग्रेस त्यांना रस्त्यावर उतरून धडा शिकवेल,” असा इशारा त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ व खजिनदार अभय छाजेड उपस्थित होते.