मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या (AWS) मुंबईतील डेटा सेंटरचे ऑनलाईन भूमिपूजन पार पडले. या माध्यमातून कंपनीने राज्यातील पहिल्या टप्प्यातील $8.4 बिलियन गुंतवणुकीचा शुभारंभ केला. ही गुंतवणूक आधीच कार्यरत असलेल्या $3.7 बिलियनच्या डेटा सेंटर्स व्यतिरिक्त केली जात आहे.
फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्र हे देशातील गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र असून, दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सर्वाधिक गुंतवणूक राज्यानेच आकर्षित केली आहे. याच परिषदेत ॲमेझॉनसोबत क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात सामंजस्य करार झाला होता, त्याची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीत ॲमेझॉन महत्त्वाचे योगदान देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सरकार सतत ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’साठी प्रयत्नशील असून, परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी ‘वॉर रूम’ कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उद्योजकांना ‘रिअल टाइम इन्फॉर्मेशन’ मिळण्यासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आली आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ॲमेझॉन मोबाईल STEM लॅब उपक्रमांतर्गत भारतातील पहिली ‘थिंक बिग मोबाईल व्हॅन’ सुरू करण्यात आली. ही व्हॅन शासकीय शाळांमध्ये फिरून ४ हजार विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संशोधन व नाविन्यपूर्ण संकल्पना विकसित करण्यासाठी प्रोत्साहित करणार आहे.
या कार्यक्रमाला ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे ग्लोबल पब्लिक पॉलिसी उपाध्यक्ष माइकल पंक, AWS इंडिया चे मुख्य कार्यकारी अध्यक्ष संदीप दत्ता यांसह मान्यवर उपस्थित होते.