’शहीद कॅप्टन विनायक गोरे’ लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग • जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप ठरले प्रेरणास्त्रोत
मुंबई : विद्याविहार येथील के.जे. सोमय्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचा ६६ वा वर्धापन दिन देशभक्तीच्या भावनेत साजरा झाला. यावेळी ठाणे जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी गेल्या ३० वर्षांपासून अखंड सादर करत असलेल्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ या एकपात्री लघुनाटिकेचा ५००० वा प्रयोग सादर करून प्रेक्षकांना भारावून टाकले.
१९९५ मध्ये जम्मू-काश्मीर सीमेवर शहीद झालेल्या कॅप्टन विनायक गोरे यांच्या शौर्यावर आधारित या नाटिकेतून देशभक्तीचा संदेश देत सानप यांनी तीन दशकांत विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा जागवली आहे. या प्रयोगातून अनेक युवक सैन्यात दाखल झाले, तर काहींनी रक्तदान, अवयवदान आणि सैनिकांच्या कुटुंबांसाठी कार्य सुरू केले.

कार्यक्रमात प्राचार्य डॉ. किशन पवार यांच्या हस्ते डॉ. पवन अग्रवाल, वीरमाता अनुराधा गोरे, माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप, हिंदी साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. सतीश पांडे, लेफ्टनंट कर्नल सतीश कुमार सिंग, भाजप प्रदेश उपाध्यक्षा वर्षा भोसले, तसेच इतर माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार झाला.
वीरमाता अनुराधा गोरे म्हणाल्या, “मनोज सानप यांनी तीस वर्षे ही नाटिका अखंड सादर करून देशभक्तीची मशाल पेटती ठेवली आहे. यातून असंख्य युवकांना प्रेरणा मिळाली आहे.” माजी मुख्याध्यापिका सुमन शिवाजी सानप यांनी सानप यांच्या बालपणापासूनच्या प्रवासाविषयी अनुभव सांगितले, तर डॉ. पवन अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना योग्य ध्यास आणि कृतीद्वारे यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले.
उपप्राचार्य डॉ. सत्यवान हणेगावे यांनी प्रगती अहवाल, तर माजी विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस शिजो पॉल यांनी वार्षिक अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक सिमरन महतानी यांनी केले. शेवटी डॉ. मीरा वेंकटेश यांनी आभार मानले आणि राष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली.