मुंबई : “भाषा ही संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे माध्यम आहे. आपली मराठी भाषा कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे आणि उद्याही अभिजातच राहील,” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे आयोजित अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सदस्य मनीषा कायंदे, मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, तसेच विविध साहित्य मंडळांचे पदाधिकारी आणि अभिनेते महेश मांजरेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मराठीचा सन्मान हा संतपरंपरा, शाहिरांच्या पोवाड्यांपासून ते बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत सर्वांचा सन्मान आहे. महाराष्ट्रातील २५ टक्के ग्रंथालये, २०० हून अधिक वार्षिक साहित्य संमेलने आणि सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठीची समृद्ध परंपरा दाखवतात. डिजिटल युगातही लाखो रुपयांच्या साहित्य-विक्रीसह मराठी रंगभूमीने आपला वारसा जपला आहे.”
मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत म्हणाले, “ज्ञानेश्वर, तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. राज्य सरकार मराठीला जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करत राहील.”
त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. तसेच प्राकृत भाषेला देखील अभिजात दर्जा मिळाल्याने हा गौरव अधिक वृद्धिंगत झाल्याचे ते म्हणाले.
या सोहळ्यात हेमांगी अंक, नवभारत मासिक विशेषांक, मराठीची ये कौतुके हे पुस्तक, संदर्भ ग्रंथालय माहिती पुस्तिका तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी ॲपचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट व आवरणाचे अनावरणही यावेळी झाले.