मुंबई – अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असूनही मदत न मिळाल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने आज राज्यभर तीव्र आंदोलन केले.
काँग्रेसने सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची, नुकसानग्रस्तांना हेक्टरी ₹५० हजार तातडीने देण्याची, सरसकट कर्जमाफीची, वीज थकबाकी माफ करण्याची व खरवडलेल्या जमिनीला अतिरिक्त भरपाई देण्याची मागणी केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार डॉ. कल्याण काळे व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. तर चंद्रपूरमध्ये खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली नागपूर-चंद्रपूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन झाले. यात कापूस उत्पादकांना हेक्टरी ₹१ लाख आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ₹२.५ लाख नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर ग्रामीण, जालना, लातूर, वर्धा, रत्नागिरीसह राज्यभरातील जिल्ह्यांत व तालुक्यांतही आंदोलने झाली. शेकडो शेतकरी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि प्रशासनाला निवेदने दिली.