मुंबई – “रस्ता अपघातात जसा ‘गोल्डन अवर’ जीव वाचवतो, तसाच सायबर फसवणुकीतही ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर तक्रार द्याल, तितकी फसवलेली रक्कम परत मिळवणे सोपे होते. त्यामुळे तातडीने १९३० किंवा १९४५ या हेल्पलाइनवर संपर्क साधा,” असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ते महाराष्ट्र पोलीस मुख्यालय येथे झालेल्या ‘सायबर जनजागृती माह ऑक्टोबर २०२५’ उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, तसेच व्हीजेटीआय व आयआयटी मुंबईचे मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, “आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून फिशिंग, ओटीपी फसवणूक, डीपफेक, आवाज-चेहरा क्लोनिंग यांसारख्या नव्या तंत्रांनी गुन्हेगार सामान्य नागरिकांना फसवत आहेत. सोशल मीडियावरील माहिती शेअर करणे, कुकीज स्वीकारणे यामुळे वैयक्तिक माहिती गैरवापरास जाते. त्यामुळे सायबर बुलिंग, खंडणी, फसवणूक यांसारखे प्रकार वाढत आहेत.”
राज्यात जागतिक दर्जाच्या सायबर सिक्युरिटी लॅब, प्रतिसाद केंद्रे आणि रेग्युलेटरी यंत्रणा उभारण्यात आल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, “गुन्हा झाल्यानंतर नुकसान कमी करणे आणि गुन्हेगाराला शिक्षा मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानच धोका असून त्यावर उपायही तंत्रज्ञानातच आहे. कोणताही डिजिटल गुन्हा ‘डिजिटल फिंगरप्रिंट’ मागे ठेवतो. त्यामुळे तक्रारीसोबत क्षमता व जनजागृती दोन्ही गरजेच्या आहेत.”
कार्यक्रमात सायबर सुरक्षा विषयक माहितीपट दाखविण्यात आला, ‘सायबर योद्धा’ या मुलांसाठीच्या कॉमिक बुकलेटचे प्रकाशन झाले आणि सायबर जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या सायबर वॉरियर्सचा सत्कारही करण्यात आला.