सिंधुदुर्ग / सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) कारभारातील कोट्यवधी रुपयांच्या अनियमित कर्जवाटपांबाबत भीषण घोटाळ्याचे धक्कादायक तपशील समोर आले आहेत. तक्रारदार राजन तेली यांनी दाखल केलेल्या सविस्तर तक्रारीत बँकेतील वरिष्ठ अधिकारी, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच काही प्रभावशाली उद्योजक आणि राजकीय नेत्यांनी संगनमत करून बँकेच्या निधीची प्रचंड अफरातफर केल्याचा आरोप केला आहे.
तक्रारीनुसार, बँकेने नियमबाह्य पद्धतीने काही निवडक व्यक्तींना १२ कोटी ते २५ कोटी रुपयांपर्यंतची कर्जे दिली आहेत. ‘गोल्ड रिसॉर्ट प्रकल्प’, ‘टुरिझम प्रोजेक्ट’ अशा बनावट नावाखाली बनावट व्यवसाय दाखवून निधी वळवण्यात आला. या सर्व कर्जांमागे भाजपशी संबंधित काही नेते व उद्योजकांचे थेट हितसंबंध असल्याचेही तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे.




तक्रारपत्रात डॉ. निलेश बाणावळकर, श्रीराम महाजन, अंकित कसार, श्रीधर महाजन, श्रीराम महाजन, नितेश राणे, मनीष देवकी आणि डॉ. प्रमोद गावडे या नावांचा विशेष उल्लेख आहे.
आरबीआयने निर्धारित केलेल्या बँकिंग नियमांचे आणि सहकारी बँक कायद्याचे उघड उल्लंघन करून कर्जे मंजूर करण्यात आली. कोणतीही जोखीम मूल्यांकन न करता, सुरक्षा हमीशिवाय आणि बाजारमूल्याच्या पलीकडील कर्जरक्कम देऊन, बँकेचा आर्थिक पाया डळमळीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात बँकेच्या व्यवस्थापनाने ठोस कारवाई न करता प्रकरण गप्प बसवले, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
कर्जवाटप प्रक्रियेत सहभागी असलेले नितेश राणे, मनीष देवकी आणि डॉ. प्रमोद गावडे यांनी हितसंबंधाचा थेट संघर्ष ठेवून स्वतःच्या वा निकटवर्तीयांच्या कंपन्यांना कर्ज मंजूर करून घेतल्याचे पुरावे तक्रारीत नमूद आहेत. यामुळे बँकेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
तक्रारदार राजन तेली यांनी कोकण पोलीस महानिरीक्षक आणि सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत पुढील मागण्या केल्या आहेत –
नितेश राणे, मनीष देवकी आणि डॉ. प्रमोद गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा. सर्व कर्जवाटप व्यवहारांची चौकशी स्वतंत्र समितीकडून करावी. बँकेच्या अधिकाऱ्यांचा शिस्तभंग व भ्रष्टाचार प्रकरणात सहभाग तपासावा. या व्यवहारात सहभागी असलेल्या खाजगी उद्योजकांवर देखील गुन्हे दाखल करावेत.
तक्रारीनुसार या बेकायदेशीर कर्जवाटपांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक ओझे पडले असून, बँकेच्या ठेवीदारांचा निधी धोक्यात आला आहे. यामुळे भविष्यात बँकेला आर्थिक दिवाळखोरीचा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे.
“हा प्रकार म्हणजे राजकीय आश्रयाने झालेली आर्थिक लूट आहे. बँकिंग व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा हा गंभीर गुन्हा आहे,” असे तक्रारदार राजन तेली यांनी म्हटले असून त्यांनी मुख्य आरोपींवर तातडीने फौजदारी कारवाई करून तपास सुरू करण्याची मागणी केली आहे.

