मुंबई : राज्यातील शेतकरी आणि शेतमजूर अजूनही अभूतपूर्व पूरपरिस्थितीतून सावरलेले नाहीत, त्यात सरकारकडून कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही. आता दिवाळीचा आनंदही किरकोळ वाटणार आहे, कारण यंदा शासनाकडून ‘आनंदाचा शिधा’ योजना बंद करण्यात आली असल्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप-शिंदे सरकारकडून केलेल्या ‘आमिष घोषणांचा फुगवटा आता फुटल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे गणेशोत्सवात जशी रेशनवरील गोडधोड वस्तू थांबवल्या, तशीच दिवाळीतील ‘आनंदाचा शिधा’ योजना देखील बंद करण्यात आली आहे.
पूरग्रस्त शेतकरी आणि शेतमजूर आजही विस्कळीत आयुष्य जगत आहेत. नुकसानभरपाई तर दूरच, आता रेशनवर मिळणारे चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल यांसारखे दिवाळीचे पदार्थही थांबवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये नाराजी वाढली असून, “सरकारकडे सणांसाठी जाहिरातींसाठी पैसा आहे पण गरीबांच्या पोटासाठी नाही” अशी टीका होत आहे.
सरकारच्या उधळपट्टीमुळे अनेक कल्याणकारी योजना आता थांबल्या आहेत. शिवभोजन थाळी योजना बंद. तीर्थाटन योजना बंद पडण्याच्या मार्गावर. आनंदाचा शिधा स्थगित. यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकारविषयीचा विश्वास डळमळीत होत आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात आज अन्न नाही, नुकसानभरपाई नाही, आणि आता रेशनवरचा शिधाही थांबवला गेला आहे. सरकार सणांच्या जाहिरातींसाठी कोट्यवधी उधळत आहे पण जनतेसाठी काही नाही. हे सरकार आर्थिकदृष्ट्या पूर्णतः अपयशी ठरले आहे.”
‘आनंदाचा शिधा’ थांबवण्याचा निर्णय हा सरकारच्या आर्थिक तुटीचा थेट पुरावा मानला जात असून, “रेवड्या संपल्या आणि आता नुसताच ढोल वाजतोय” अशी बोचरी टीका होत आहे.