मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत निषेधार्ह आणि असभ्य भाषेतले असल्याची कठोर प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.
मराठा समाजाचे नेतृत्व करताना, “समाजाची संस्कृती आणि सुसंस्कृत परंपरा पाळणे गरजेचे आहे,” असा इशारा सावंत यांनी जरांगे यांना दिला.
सचिन सावंत म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या भाषेमुळे मराठा समाजाची अप्रतिष्ठा होत आहे. ही भाषा मराठा समाजाच्या सुसंस्कृत प्रतिमेला शोभणारी नाही. समाजाच्या लढ्याची दिशा खालच्या पातळीवर नेऊ नका.” ते पुढे म्हणाले, “आरक्षणाचा लढा हा केवळ मागण्यांचा नाही, तर तो समाजाला आदर्श घालून देण्याचाही आहे. आपल्या ५८ विराट मूक मोर्चांनी माय-भगिनींनी देशासमोर आदर्श ठेवला आहे, तो आदर्श तसाच टिकवला पाहिजे.”
जरांगे यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सावंत म्हणाले, “राहुल गांधी यांनीच जातीय जनगणनेची मागणी करून सर्व समाजघटकांना न्याय मिळावा यासाठी आवाज उठवला. त्यांनीच ठणकावले की काँग्रेस सत्तेत आल्यानंतर आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल. हीच भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मार्गाला न्याय देणारी ठरेल.”
काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच कोणावरही अन्याय न करता, संविधानाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.
सावंत म्हणाले, “काँग्रेस पक्ष संविधान आणि त्यातील मूल्यांना मानतो. टीका करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण ती टीका संविधानाच्या चौकटीत, संस्कृतीच्या परिघात आणि सुसंस्कृततेच्या मर्यादेत असली पाहिजे.”
ते पुढे म्हणाले, “आम्ही मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांबरोबर होतो, आहोत आणि राहू; पण आता जरांगे यांच्या भाषेतून राजकीय वास येऊ लागला आहे, हे दुर्लक्षित करता येणार नाही.”
सचिन सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटले, “काँग्रेसच्या शब्दकोशात जुमलेबाजी, जनतेची फसवणूक, खोटे जीआर किंवा गॅझेटच्या नावाने शब्दच्छल हे प्रकार नाहीत. आम्ही जे करतो ते प्रामाणिकपणे, जनसेवेसाठी आणि संविधानाच्या चौकटीत राहून करतो.”
मनोज जरांगे यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा नैतिक आणि वैचारिक दर्जा खालावत असल्याची चिंता काँग्रेसने व्यक्त केली आहे. सावंत यांनी स्पष्ट केले की, “आंदोलन हे समाजाच्या सन्मानासाठी असते, व्यक्तीगत राजकारणासाठी नव्हे.”