मुंबई : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगारांच्या विविध मागण्या योग्य असून, शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे ठोस आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी मंत्रालयात एसटी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत दिले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सरनाईक म्हणाले, “कामगारांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, दिवाळी अग्रिम आणि इतर थकीत देणी पूर्ण करण्याचा विचार शासन गांभीर्याने करत आहे.” २०१८ पासून प्रलंबित असलेल्या या देणग्यांसाठी सुमारे ४४०० कोटी रुपयांची तरतूद आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, केवळ थकीत देणी चुकवण्यावर थांबता कामा नये, तर एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचे धोरण सरकार राबवत आहे.
त्याअंतर्गत –
• एसटीवरील जाहिराती आणि पार्सल सेवा यांतून सुमारे २०० कोटी रुपये उत्पन्न मिळवण्याची योजना,
• महामंडळाच्या मालकीच्या पेट्रोल पंपांच्या व्यावसायिक वापरातून आणखी २००–२५० कोटी रुपये,
अशा प्रकारे दरवर्षी ५०० ते ६०० कोटी रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच “आपली एसटी” या नव्या ॲपद्वारे टॅक्सी, रिक्षा आणि ई-बाईक सेवा सुरू करण्याचीही घोषणा सरनाईक यांनी केली.
याशिवाय, पीपीपी तत्त्वावर महामंडळाच्या जागांचा विकास करून दरवर्षी १००० ते १५०० कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची योजना असून, त्यातून कामगारांसाठी घरे आणि विश्रांतीगृहांच्या सुविधा उभारण्यात येतील.
परिवहन मंत्र्यांनी पुढे सांगितले की, पुढील वर्षअखेरपर्यंत ८ हजार नवीन बसेस ताफ्यात दाखल होणार असून, एकूण बससंख्या २० हजारांपर्यंत पोहोचेल. तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने काही भरती केली जाणार असली, तरी ही फक्त “तात्पुरती मलमपट्टी” असेल. लवकरच शासनाकडून १० ते १२ हजार कायम चालक आणि वाहक पदांसाठी मंजुरी घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, तसेच संघटनांचे प्रतिनिधी संदीप शिंदे, समीर मोरे, श्रीरंग बरगे, हनुमंत ताटे, प्रकाश निंबाळकर, मुकेश तिगोटे, प्रदीप धुरंधर आदी उपस्थित होते.