महाराष्ट्र ताज्या बातम्या

NCC : शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

मुंबई: राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, तंदुरुस्ती आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी शालेय स्तरावर एनसीसीचे प्रशिक्षण सुरू करण्यात यावे, असे निर्देश क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत.

आज मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), स्काऊट आणि गाईड संदर्भातील बैठकीत त्यांनी ही भूमिका मांडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भूसे यांनी शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्यासंदर्भात केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना, शिस्त आणि क्रीडाप्रेम अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री कोकाटे म्हणाले की, “माजी सैनिक, एनसीसीचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांना क्रीडा आणि कवायतीचे प्रशिक्षण द्यावे.” लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, स्वयंशिस्त आणि प्रगल्भ विचार निर्माण करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

“विद्यार्थ्यांना मैदानी खेळांची आवड निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर सक्तीचे क्रीडा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा, यासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याचे धोरण तयार करावे,” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, क्रीडा शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना शिक्षक नियुक्तीत विशेष सवलत देण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

मंत्री कोकाटे यांनी नमूद केले की, “एनसीसीचे प्रशिक्षण हे नेतृत्वगुण, चारित्र्यसंवर्धन, सेवाभाव आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यभूत ठरू शकेल अशी शिस्तबद्ध प्रशिक्षित तरुण शक्ती घडविणे हे एनसीसीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, स्काऊट-गाईड चळवळीद्वारे ग्रामीण, शहरी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांचे संवर्धन घडवले जाते.

बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील विद्यालये आणि महाविद्यालयांमधून एकूण १,००,८८४ विद्यार्थी एनसीसी प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये कनिष्ठ विभागात ६१,३२८ आणि वरिष्ठ विभागात ३९,५०२ विद्यार्थी सहभागी आहेत.

बैठकीला आयुक्त शितल तेली, शिक्षक संचालक राहुल रेखावार, एनसीसी कॅप्टन जे. जॉर्ज, सहाय्यक संचालक मिलिंद दीक्षित, उपसंचालक डॉ. वंदना वाहूळ, तसेच अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात