मुंबई — पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना कसा देण्यात आला, यावरून राज्यात राजकीय वाद पेटला आहे. या परवान्याच्या प्रकरणाचा “गुंता” सुटता सुटत नाही, अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेपासून, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यापर्यंत सर्वांनी या विषयावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला होता.
मात्र गुरुवारी खुद्द गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या वादात थेट एंट्री घेत विरोधकांना खडे बोल सुनावत ‘यशस्वी एन्काऊंटर’ केल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
गृहराज्यमंत्री कदम यांनी आपल्या ‘X’ (ट्विटर) खात्यावरून स्पष्टीकरण देत स्पष्ट केले की, “सचिन घायवळला शस्त्र परवाना आपण दिला असा आरोप विरोधक करत आहेत, पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. हे प्रकरण जून महिन्यात माझ्यासमोर आले तेव्हा त्याची काटेकोर पडताळणी करण्यात आली होती.”
त्यांनी पुढे सांगितले की, २०१५ साली न्यायालयाने सचिन घायवळला सर्व आरोपांत निर्दोष ठरवले होते. गृह विभाग आणि पोलीस खात्याच्या अहवालांच्या आधारेच निर्णय घेतला गेला.
“मी कोणत्याही राजकीय दबावाखाली न येता, पोलीस विभागाच्या अधिकृत अहवालावरच निर्णय घेतला. त्याचवेळी पुणे पोलीस आयुक्तांना स्पष्ट निर्देश दिले की, घायवळची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याला कोणताही परवाना देऊ नये.”
कदम पुढे म्हणाले, “उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आणि टुकार आहेत. सत्तेपासून दूर झाल्याने विरोधक वैफल्यग्रस्त झाले असून फक्त टीकेसाठी विषय शोधत आहेत.”
योगेश कदम यांनी पुढे म्हटले की, “शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम हे विरोधकांच्या टीकेचा आवडता विषय राहिले आहेत. त्यामुळे मी त्यांचा मुलगा आणि मंत्री झाल्यानंतर नैसर्गिकच विरोधक मला लक्ष्य करत आहेत.” त्यांनी पुढे सांगितले, “फक्त मीच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्यावरही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाने निराधार आरोप केले आहेत. आम्ही मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी प्रेरित होऊन राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
घायवळ शस्त्र परवाना प्रकरणानंतर विरोधकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या स्पष्ट आणि ठोस भूमिकेनंतर हा वाद कोणत्या दिशेने वळतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.