जयपूर : जगप्रसिद्ध जयपूर साहित्य महोत्सवाच्या १९व्या आवृत्तीसाठी दुसऱ्या वक्त्यांच्या यादीची घोषणा करण्यात आली आहे. वेदांताच्या सहकार्याने सादर होणारा हा महोत्सव १५ ते १९ जानेवारी २०२६ दरम्यान हॉटेल क्लार्क्स आमेर, जयपूर येथे होणार असून जागतिक साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कलात्मक क्षेत्रातील मान्यवरांना एकाच मंचावर एकत्र आणणार आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत विविध क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तींचा समावेश आहे. त्यात CERN जिनिव्हा येथील वरिष्ठ भौतिकशास्त्रज्ञ अर्चना शर्मा, भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ एस्थर डुफ्लो, आयर्लंडचे माजी पंतप्रधान लिओ वराडकर, कला इतिहासकार डेब्रा डायमंड, प्रायव्हेट आयचे संपादक आणि व्यंग्यकार इयान हिस्लॉप, कवी-कादंबरीकार जीत थायल, बुकर पुरस्कार विजेते किरण देसाई, कवी अॅलिस ओसवाल्ड, कला समीक्षक अँड्र्यू ग्राहम-डिक्सन, कादंबरीकार अश्विन सांघी, तिबेट-भूतान विषयातील लेखिका कुनझांग चोडेन रोडर, इतिहासकार नारायणी बसू, पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, लेखक-हिमालयन इतिहासकार स्टीफन अल्टर, अपंगत्व हक्क कार्यकर्त्या व लेखिका तारिणी मोहन, साहित्यिक व प्रकाशक विल्यम सीगहार्ट, आणि तेलुगू स्त्रीवादी लेखिका व्होल्गा यांचा समावेश आहे.

महोत्सवाच्या सह-संचालिका नमिता गोखले यांनी सांगितले की, “महोत्सवाची १९ वी आवृत्ती भारतीय आणि जागतिक साहित्याच्या समृद्ध परंपरेचा गौरव करताना नव्या कल्पना आणि आवाजांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ ठरेल.”
सह-संचालक विल्यम डॅलरिम्पल म्हणाले, “यंदाची वक्त्यांची श्रेणी अत्यंत विलक्षण आहे. जगातील दिग्गज लेखक, विचारवंत आणि कलाकारांना पाहण्यासाठी जयपूर २०२६ जरूर भेट द्या.”
टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय के. रॉय म्हणाले, “हा महोत्सव अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विविधता आणि संवादाच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. जगभरातील प्रभावी आवाजांना जोडण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
वेदांत रिसोर्सेसच्या संचालिका प्रिया अग्रवाल म्हणाल्या, “कथाकथन आणि संवाद समाज बदलू शकतात — यावर आमचा विश्वास आहे. या महोत्सवाला सहकार्य करण्याचा आम्हाला सन्मान आहे.”
महोत्सवात साहित्यिक सत्रांसोबतच जयपूरच्या वारसा स्थळांवर हेरिटेज इव्हनिंग्ज, संगीत सादरीकरणे, जयपूर म्युझिक स्टेज, तसेच प्रकाशन उद्योगासाठी जयपूर बुकमार्क ही विशेष प्लॅटफॉर्म सादर होईल.
अधिक माहितीसाठी:
वेबसाइट: https://jaipurliteraturefestival.org
ईमेल: manas@teamworkarts.com / apeksha@teamworkarts.com / IndiaJLF@edelman.com

