महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठा, आकाशवाणी ते सकाळ : सहा दशकांची वसंतराव देशपांडे यांची वैभवशाली पत्रकारिता!

मुंबई: मराठी पत्रकारितेतील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे वसंतराव वासुदेव देशपांडे उर्फ दादा देशपांडे यांनी सहा दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने, भाष्याने आणि दूरदृष्टीने राज्यातील पत्रकारितेला नवा आयाम दिला आहे. १० नोव्हेंबर रोजी दादा आपले वयाची ९२ वर्षे पूर्ण करून ९३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.

दादांनी आपली पत्रकारिता १ नोव्हेंबर १९५६ रोजी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या दैनिक मराठा मधून सुरू केली. काही वर्षांतच ते आकाशवाणीत आले आणि ९ ऑगस्ट १९६० रोजी मराठाचा राजीनामा देऊन १० ऑगस्ट १९६० रोजी आकाशवाणीमध्ये पत्रकार म्हणून रुजू झाले.

तेव्हा मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १३ ऑगस्ट १९६० रोजी बालमोहन विद्यामंदिर, दादर येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या संपादकत्वाखाली “मार्मिक” या जगातील पहिल्या मराठी व्यंगचित्र साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला. या ऐतिहासिक घटनेचे वृत्तांकन करण्याची जबाबदारी दादांवर होती, आणि त्या क्षणाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार ठरले.

दादा आठवणींना उजाळा देताना म्हणतात, “त्या काळात मी ‘आकाशवाणी’साठी काम करत होतो. ‘मार्मिक’, ‘शिवसेना’ आणि नंतर ‘सामना’ या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्रिशूळ’ प्रवासाचा मी जवळून साक्षीदार आहे — ही माझी खरी संपत्ती आहे.”

दादा देशपांडे आणि स्वातंत्र्यसैनिक जेठालाल शाह हे दोघेही ९२ वर्षांचे असून, शाह हे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले सेनानी आहेत. अहमदनगरमधील लोकमान्य टिळक यांच्या ऐतिहासिक घोषणेच्या मैदानावर त्यांनी राष्ट्रसेवा दलाच्या शाखांमध्ये रावसाहेब पटवर्धन आणि अच्युतराव पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.

यानंतर दोघे चित्रा साप्ताहिकात पत्रकार झाले. दादांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात अर्ज केला, तर पुढे आचार्य अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा मध्ये स्थायिक झाले.

१९५६ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या काळातील राजकीय, सामाजिक आणि विधिमंडळीन घटनांचा दादांनी जवळून अभ्यास केला आहे. मोरारजी देसाईपासून उद्धव ठाकरेपर्यंतच्या काळात ते सतत सक्रिय राहिले.

त्यांच्या कारकिर्दीत विधानमंडळातील संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि वि. स. पागे केंद्रातर्फे तयार केलेल्या अनेक ग्रंथ, भाषणसंग्रह आणि अहवालांसाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. १९५७ पासून आतापर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचे दस्तऐवजीकरण, प्रवेशपत्रिका आणि अधिवेशनातील नोंदी त्यांनी जतन केल्या आहेत — ही स्वतःतच एक जिवंत ऐतिहासिक संग्रहशाळा आहे.

दादांनी आपल्या अनुभवांचा अमूल्य ठेवा दोन ग्रंथांमध्ये साठवला —
1. ‘महाराष्ट्राची सुवर्णगाथा’ – ग्रंथाली प्रकाशनतर्फे २८ फेब्रुवारी २०११ रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रकाशित.
2. ‘सहा दशकांची पत्रकारिता’ – दादांचे आत्मकथनात्मक अनुभवलेखन, ज्याचा परिचय ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांनी करून दिला.

कोरोनाच्या काळात हे वाङ्मय जनतेपर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु आज ते मराठी पत्रकारितेच्या अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ग्रंथ ठरू शकते.

दादांनी मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघात सक्रिय भूमिका निभावली. संघटनात्मक रचना, घटना दुरुस्ती, नियमावली, पुरस्कार योजना, निवड समित्या या सर्व स्तरांवर त्यांनी अत्यंत दक्षता आणि प्रामाणिकपणे काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विधानमंडळ सचिवालयालाही अनेक वेळा झाला.

दादांनी अनेक नामांकित पत्रकारांसह — व्ही. टी. देशपांडे, व्ही. के. नाईक, यशवंत मुळ्ये, दिलीप चावरे, भारतकुमार राऊत, दिनकर रायकर आणि इतर अनेकांसह — काम केले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली पत्रकारांची पिढी आजही दादांना आपला “जीवंत संदर्भग्रंथ” मानते.

२ एप्रिल २०२१ रोजी दादांच्या सहधर्मचारिणी शुभदा देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन झाले. मूळच्या नंदुरबारच्या शुभदा यांनी संकटांना न जुमानता दादांना अखंड साथ दिली. दादांचे सुपुत्र मिलिंद देशपांडे यांचा वाढदिवसही १० नोव्हेंबरलाच येतो — आणि आज संपूर्ण परिवार दादांना फुलासारखे जपत आहे.

वसंतराव देशपांडे म्हणजे माहितीचा जिवंत खजिना — “मराठा” पासून “सकाळ” पर्यंत सहा दशकांची असामान्य वाटचाल करणारे दादा म्हणजे महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे ऐतिहासिक स्मारकच म्हणावे लागेल.

आपण सर्वांनी दादांना उदंड आयुष्य, ठणठणीत आरोग्य आणि अखंड सर्जनशीलता लाभावी, अशी प्रार्थना करुया. कारण त्यांच्या आठवणी, अनुभव आणि लेखणी हा मराठी पत्रकारितेचा अमूल्य वारसा आहे.

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

1 Comment

  1. 益群网

    November 9, 2025

    益群网:终身分红,逆向推荐,不拉下线,也有钱赚!尖端资源,价值百万,一网打尽,瞬间拥有!多重收益,五五倍增,八级提成,后劲无穷!网址:1199.pw

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात