महाराष्ट्र ताज्या बातम्या

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य…!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ घोषवाक्याचे अनावरण

मुंबई — राज्याच्या कृषी विभागाला तब्बल ३८ वर्षांनंतर नवी ओळख मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे आणि ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख उपस्थित होते. या वेळी बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मानही करण्यात आला.

‘नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ’ — कृषी मंत्री भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, “महाराष्ट्राची शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रगतीचे प्रतीक ठरेल. हा बदल म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे.”

३८ वर्षांनंतर बदलले दृश्य आणि संवादात्मक रूप

भरणे यांनी सांगितले की, “कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह ३८ वर्षांपूर्वी तयार झाले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करणे आवश्यक होते.”

या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून ७६१ बोधचिन्ह प्रस्ताव आणि ९४९ घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांमधून उत्कृष्ट कल्पनांची निवड करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने समिती गठित करण्यात आली होती.

विजेते आणि अंतिम निवड प्रक्रिया

समितीने प्रत्येक प्रस्तावाचे तपशीलवार परीक्षण करून शासनाला प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केली. शासनाने अंतिम निवड केल्यानंतर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला औपचारिक मान्यता देण्यात आली. बोधचिन्ह स्पर्धेचे विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ), तर घोषवाक्य स्पर्धेची विजेती सौ. सिद्धी भारतराव देसाई (परभणी) असून, त्यांचा कृषी विभागातर्फे सन्मान करण्यात आला.

भविष्यातील वापर आणि कायदेशीर संरक्षण

भरणे यांनी स्पष्ट केले की, “या नव्या उपक्रमामुळे कृषी विभागाची दृश्य ओळख अधिक सशक्त होईल. यापुढे विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाईल. या प्रतीकांचा अनधिकृत वापर झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.”

कार्यक्रमातील मान्यवर

या अनावरण सोहळ्याला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी आणि कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

1 Comment

  1. QuickThinker

    November 11, 2025

    My thoughts exactly.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात