मुंबई – 2021 पासून भाजप–शिंदे युतीचे सरकार आल्यानंतर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करीत आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करतात, मात्र वास्तव याच्या पूर्ण उलट असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे—काँग्रेसच्या एका आमदाराने थेट भाजपच्या मंत्र्याला कुटुंबासहित “संपवण्याची” दिलेली कथित धमकी!
घटना मालाड–मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यावरून उद्भवली. 2022 मध्ये युती सरकारच्या काळात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले आणि आताच्या महायुती सरकारमध्ये सहपालकमंत्री असलेले कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे रोहिंग्या आणि घुसखोर बांगलादेशींच्या मुद्द्यावर सतत आक्रमक भूमिकेत आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे मालवणीत हजारो चौरस मीटरवरील अतिक्रमणांवर कारवाई सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 9,000 चौरस मीटर सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.
याच कारवायांमुळे स्थानिक काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री अस्लम शेख यांनी लोढा यांना थेट कुटुंबासहित ‘संपवण्याची’ धमकी दिल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी लोढा यांनी केला. लोढा यांनी आज मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेऊन औपचारिक निवेदन देत अस्लम शेख यांच्यावर तातडीने कारवाईची मागणी केली. या घटनेनंतर मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
काही नेत्यांनी या वादाला भाजप निवडणुकीच्या तोंडावर जातीय रंग देत असल्याचा आरोप केला असला तरी, मुद्दा अत्यंत गंभीर असल्याचे भाजपच्याच अनेक पदाधिकाऱ्यांचे मत आहे. “कायदा व सुव्यवस्था भक्कम असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीसांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन गुन्हा दाखल करून अटक करावी,” अशी मागणी भाजपच्या काही आमदारांनीही दबक्या आवाजात मांडली आहे.
गंभीर बाब अशी की दिल्लीतील भीषण बॉम्बस्फोट प्रकरणातील अटक आरोपींना मिळालेले राजकीय पाठबळ तपासात उघड होत असताना, मुंबईसारख्या संवेदनशील शहरात रोहिंग्या–बांगलादेशी अतिक्रमणाविरुद्ध कारवाई करणाऱ्या मंत्र्याला ‘संपवण्याची’ धमकी देणे हे अतिगंभीर ठरते.
“मुंबई जागतिक आर्थिक केंद्र आहे. दहशतवादी धोक्याच्या सावटाखाली असताना सुरक्षेला तडा जाईल अशा धमक्या आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा लोढा यांनी दिला.
दरम्यान, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनीही संताप व्यक्त करत आमदार अस्लम शेख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे.

