मुंबई : मुंबईतील मनोरा आमदार निवास इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून हे काम २०२८ पर्यंत निर्धारित मुदतीत पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. बनसोडे यांनी बुधवारी कामाच्या ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आणि बांधकामासंदर्भात सर्वसमावेशक आढावा घेतला.
पाहणीदरम्यान झालेल्या बैठकीत उपाध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुविधांची गुणवत्ता, सुरक्षितता, तांत्रिक बाबी आणि बांधकामाच्या गती यासंबंधी आवश्यक सूचना दिल्या. बांधकामाची गती समाधानकारक असली तरी काही तांत्रिक मुद्द्यांवर अतिरिक्त लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
“मनोरा आमदार निवासाचे सर्व कामे वेळेत, नियोजनबद्धपणे आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत. या कामात कोणत्याही प्रकारचा विलंब सहन केला जाणार नाही,” असा कडक इशारा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिला.
मनोरा आमदार निवास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आमदारांसाठी आधुनिक सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्चस्तरीय सुरक्षितता असलेले नवे निवासस्थान उपलब्ध होणार आहे. यामुळे आमदारांच्या निवास समस्येचे मोठ्या प्रमाणावर निराकरण होईल, असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

