मुंबई : गेले तीन दशके पत्रकारितेत कार्यरत असलेले कोकणातील सुपुत्र श्रीरंग सुर्वे यांना यंदाचा ‘कोकण रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
कोकणच्या दृष्टीनं प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या या पुरस्काराबाबत बोलताना संजय कोकरे यांनी सांगितले की, “श्रीरंग सुर्वे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केलेली सातत्यपूर्ण समाजसेवा आणि लोकहिताची बांधिलकी लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.”
श्रीरंग सुर्वे यांनी मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघात सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सल्लागार अशी विविध जबाबदाऱ्या भूषवल्या आहेत. कोविड काळात त्यांनी केलेल्या कार्याची, नागरिकांना दिलेल्या सहाय्याची आणि सातत्याने केलेल्या माहितीसेवेची दखल म्हणून रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट कडूनही त्यांचा गौरव करण्यात आला होता. ते राहतात त्या परिसरातही त्यांनी समाजसेवेची परंपरा जोपासली आहे.
पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, प्रशासकीय आणि लोकजीवनाशी निगडित विषयांवर त्यांनी परखड मते आणि विश्लेषणात्मक लेख सतत मांडले आहेत. कोकणाच्या पर्यटन विकासासाठी त्यांनी केलेले विशेष लेखनही उल्लेखनीय आहे.
सर्वांगीण कार्य, सामाजिक बांधिलकी आणि पत्रकारितेतील योगदान विचारात घेऊन सुर्वे यांच्या नावावर ‘कोकण रत्न’ पुरस्कार निश्चित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. हा पुरस्कार १३ डिसेंबर २०२५ रोजी, सायंकाळी मुंबई मराठी पत्रकार संघात प्रदान केला जाणार आहे.

