महाड — ऐतिहासिक महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीमुळे प्रचाराला रंगत आली असून, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर दोन दिवस महाडमध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे महाडमधील निवडणूक प्रचाराला मोठी गती मिळणार असल्याची चर्चा आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप यांनी औपचारिक युती केली असून राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी सुदेश कलमकर यांच्या नावासह १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. भाजपने ५ जागांवर नगरसेवक पदाचे उमेदवार उतरवले आहेत. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदे जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी संयुक्त मोहीम राबवण्याचे ठरवले आहे.
भाजपच्या बाजूने प्रचारनियोजनासाठी रायगड जिल्हा महामंत्री सतीश धारप, भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे सक्रिय झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी नगराध्यक्षा स्नेहल मनिकराव जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस हनुमंत मोतीराम जगताप, तसेच माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे हे मोठ्या फौजेसह निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.
प्रवीण दरेकर यांची प्रचारसभांची वेळ पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे:
• २८ नोव्हेंबर: गवळी आळी, महाड — प्रचारसभा
• २९ नोव्हेंबर: संत रोहिदास महाराज सभागृह — जाहीर सभा
महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप यांच्या संयुक्त सभांमुळे प्रचारात अधिक जोश निर्माण होणार असून स्थानिक राजकीय वर्तुळात या कार्यक्रमांची मोठी चर्चा आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांना या संयुक्त शक्तीमुळे स्पष्टपणे बळ मिळाल्याचे निरीक्षकांकडून म्हटले जात आहे.

