मुंबई — हिंदी पत्रकारितेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मौजे पराड येथे जागा निश्चित करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
मंत्र्यांनी सांगितले की, जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने ७–८ दिवसांच्या आत जागा निवडीबाबत अंतिम निर्णय घेऊन अहवाल सादर करावा.
संपादकाचार्य पराडकर यांच्या स्मारक उभारणीसंदर्भात अॅड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीस अधिकारी उपस्थित होते.
अॅड. शेलार म्हणाले, संपादकाचार्य बाबूराव पराडकर हे निर्भीड, मूल्यनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रेरणास्थान आहेत. हिंदी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव आजही सर्वोच्च मानले जाते. काशी येथे आधीच त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे; मात्र त्यांच्या मूळ गावी स्मारकाचा प्रस्ताव अनेक वर्षे प्रलंबित होता. पराडकर हे कोकणातील सुपुत्र असल्याने त्यांचे जीवनदर्शन आणि योगदान व्यापकपणे लोकांसमोर यावे, हेच स्मारक उभारणीमागील उद्दिष्ट आहे.
अॅड. शेलार यांनी समितीला पुढील बाबींचा विचार करण्याचे निर्देश दिले : स्मारकासाठी योग्य जागेची निश्चिती, जागेची मोजणी आणि सर्वेक्षण, स्मारकाबरोबरच गावकऱ्यांच्या मागण्यांचाही विचार, ७–८ दिवसांत अंतिम अहवाल मंत्रालयाकडे पाठवणे.

