महाराष्ट्र ताज्या बातम्या

“या निवडणुकीत फक्त पैशांचा पूर नव्हे तर अतिवृष्टीचे दर्शन!”: उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर तोफेची झोड

मुंबई – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रचार महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यभर तापवला असताना, प्रचाराला अवघे पाच दिवस शिल्लक असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथे खास पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर ठाकरी शैलीत जोरदार हल्ला चढवला.

“सत्तेत सहभागी असलेले तिन्ही पक्षांचे नेते आणि मंत्री एकमेकांवर आरोपांची फेकाफेक करत राज्यभर आपलेच वाभाडे काढत आहेत. पैशांचा पूरच नव्हे, तर अतिवृष्टीचा अनुभव रोज नागरिकांना देत आहेत,” अशी घणाघाती टीका ठाकरे यांनी केली.

दरम्यान, सिंधुदुर्गच्या मालवण येथे शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरातील ‘25 लाखांचा लाईव्ह पुरावा’ दाखवून खळबळ उडवली. त्यानंतर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडे पैशांनी भरलेली पाकिटे असल्याचा दावा करून शिंदे सेनेने त्यांना रंगेहात पकडल्याचे म्हटले. या सलग घटनांवरून विरोधकांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला असून, “या निवडणुकीत धूरच धूर आहे,” असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जोरदार सनसनाटी निर्माण केली.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष बाण सोडले. “राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही सहकारी गावोगावी फिरत आहेत. मी सहकारी म्हणतो कारण उपमुख्यमंत्री असे पद संविधानात नाही! पैशांच्या थैल्या उघडतात तिथेच साऱ्या ताफ्यांचे रस्ते फुटतात; पण शेतकऱ्यांच्या आक्रोशात बसायला कोणालाच वेळ नाही,” असा मार्मिक टोला ठाकरे यांनी लगावला.

“काही दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात शेतकऱ्यांसोबत बसलो. त्यांच्या वेदना ऐकल्या. आजवर एकाही मंत्र्याला त्यांच्याकडे जाण्यास वेळ मिळालेला नाही. मात्र जिथे नोटांचे बंडल दिसतात, तिथे मंत्र्यांचे ताफे हमखास दिसतात,” अशी टीका त्यांनी केली.

मुंबईतील प्रदूषणावरून सरकारने इथिओपियाचा हवाला दिल्याने ठाकरे संतापले. “इथं हवेत काही मिसळलंय तर ते भ्रष्टाचार! मी मुख्यमंत्री असताना आरे प्रकल्पाला परवानगी नाकारली, जागा कांजूरला दिली. आता मात्र घनदाट जंगलातील झाडांची कत्तल करून कुंभमेळ्यात साधूंच्या निवासाची परवानगी देणं— हा प्रकार नेमका कोणासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याच संदर्भात प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्दैवी चेंगराचेंगरीचा उल्लेख करत, नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यात ‘तपोवनातील हजारो झाडांची नियोजित कत्तल’ हा मुद्दा उचलला. “आमचा विरोध कुंभमेळ्याला नाही; पण झाडं मारून पुण्य कमवायचा प्रकार थांबवणार आहोत. लोक सांगताहेत की ही जागा ‘अदानी’ यांच्यासाठी साफ होतेय. त्यामुळे यांचे काय झालेय— ‘मुखात राम, आणि बगलात अदानी’… हा खेळ थांबला पाहिजे,” असा थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना नाव न घेता घेरले.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात