मुंबई — प्रायोगिक रंगभूमीला नवी पहाट देण्याच्या ध्येयाने मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे सुरू झालेल्या ‘नाट्य शुक्रवार’ या उपक्रमात आज एक विलक्षण प्रयोग रंगला — खानदेशातून, जळगावच्या परिवर्तन संस्थेने सादर केलेला एकपात्री दिर्घांक “नली”.
रंगमंचावर प्रकाश मंदावला आणि कथा संपली, पण प्रेक्षक सुन्न. हाऊस लाईट लागल्यानंतरही कुणाच्या हाताला टाळ्या दाद देण्याचे भान नव्हते. काही क्षणांनी भान परत आले… आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गडगडाटाने दुमदुमून गेले. असा दुर्मिळ अनुभव कोणाला रोज मिळतो?
श्रीकांत देशमुख यांच्या कथेवर आधारित, शंभू पाटील यांचे नाट्यरूपांतर आणि योगेश पाटील यांच्या दिग्दर्शनाचा “नली” हा नाट्यप्रयोग होता. पण या संहितेला आत्मा देणारे कलाकार होते — हर्षल पाटील. एकट्याने संपूर्ण कथा आपल्या खांद्यावर वाहत रंगमंचावर सजीव उभ्या करणाऱ्या या तरुण कलावंताने जणू काही प्रेक्षकांच्या हृदयात हात घालून भावना हलवल्या.
कथा साधी, पण दाहक.
खानदेशातील एका खेड्यातली नली — अभ्यासात मंद, हसण्यात पार तेजस्वी. तिच्या उपस्थितीत रानफुलाची मऊ, गंधाळ स्पर्शता.
बाल्या — हुशार, कष्टाळू, गावातून बाहेर पडून मोठा अधिकारी होणारा.
दोघांनाही प्रेम असतं… पण व्यक्त न केलेलं.
शब्द ओठापर्यंत येतात आणि वितळून जातात.
अंतर वाढत जातं.
आणि एक दिवस — कर्जबाजारीपणा, सावकारी दडपण, आणि नलीची आत्महत्या.
वृत्तपत्रातील छोट्या बातमीने बाळ्या ढासळतो.
प्रेक्षकही.
हर्षल पाटील एकट्याने या संपूर्ण भावविश्वाला ज्या ताकदीने उभं करतात, ते नाट्य शुक्रवारच्या उपक्रमाला एक वेगळी उंची देऊन जातात. गाव, शाळा, कुटुंब, आणि अनेक पात्रे—प्रत्येकाला वेगळी ओळख, वेगळं श्वास, वेगळी लय.
प्रकाशयोजना आणि पार्श्वसंगीताने अनुभव आणखी प्रभावी झाला.
“नली” केवळ एक नाटक नाही, तर गावातील महिलेच्या नियतीचा आरसा आहे.

