महाड — रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेच्या निवडणुकीत मतदानाच्या वेळी प्रभाग क्र. 2 आणि 3 मधील मतदान केंद्राबाहेर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भीषण हाणामारी झाली. राडा इतका वाढला की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काही गाड्यांचेही नुकसान झाले. अचानक पेटलेल्या या संघर्षामुळे शहरात तणावाचे सावट पसरले आहे.
जुन्या स्टेट बँकेजवळील मतदान केंद्राबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. बाहेरून आलेल्या लोकांची गर्दी वाढत असून ती दूर करण्याची मागणी पोलिसांकडे वारंवार केली जात होती. परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
मारहाण आणि वादाच्या घटना पोलिसांच्या डोळ्यासमोर घडत असतानाही, ते बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी स्पष्ट सांगितले.
नगर शाळा क्रमांक 5 च्या मतदान केंद्राबाहेर शिवसेना (शिंदे गट) युवानेते विकास गोगावले यांच्यावर राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत झांबरे व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गोगावले यांनी पत्रकारांना सांगितले की, आपल्यावर रोखण्यात आलेला रिव्हॉल्व्हर जप्त करून तो पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला असून पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढवून रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) तैनात केली आहे.
राष्ट्रवादीच्या विधानसभा नेत्या स्नेहल जगताप यांनी काल रात्रीपासूनच शिवसेनेचे कार्यकर्ते शहरात मोठ्या संख्येने दाखल होत असल्याचा दावा करत, हा प्रकार जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा आरोप केला आहे.
तणावाचे स्वरूप पाहता महाड पोलिसांनी शहरातील सर्व संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस दल तैनात केले आहे. कायदा-सुव्यवस्था नियंत्रणात ठेवणे हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान बनले आहे.

