एस. व्ही. यू.
मुंबई : “गेल्या दोन दिवसांपासून महापालिका प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधा आणि उणिवांविषयी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत आहोत. तरीही कोणतीही ठोस सुधारणा झालेली दिसत नाही,” अशी टीका करत महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांना पुरेशा आणि दर्जेदार सुविधा न दिल्यास पालिका अधिकाऱ्यांविरोधात ठोकशाही करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.
देशभरातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उद्या दादर चैत्यभूमीवर दाखल होणार आहेत. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज मैदानात मोठे मंडप, तात्पुरती शौचालये-स्नानगृहे, पाण्याची सोय आणि भोजन वाटपाची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. मात्र ही सर्व सुविधा निकृष्ट दर्जाच्या आणि अपुऱ्या असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी स्वप्नील जवळकर यांनी राजकारणशी बोलताना सांगितले की,
“आम्ही मैदानात आणि चैत्यभूमी परिसरात २,००० कार्यकर्त्यांची तैनाती केली आहे. पालिकेने केलेल्या सर्व सोयी तपासल्यानंतर अनेक सुविधा मानकांनुसार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, शौचालये आणि स्नानगृहे अपुरी आहेत, पाण्याचे नळ अपुरे आहेत आणि भोजनाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे.
विशेष म्हणजे, मागील वर्षी महापालिकेने किती शौचालये, स्नानगृहे आणि पाण्याचे नळ उभारले याची सविस्तर आकडेवारी अधिकृत पत्रिकेत प्रकाशित केली होती; मात्र यावर्षी ती आकडेवारी गायब असल्याचे जवळकर यांनी नमूद केले.
वंचितच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, वारंवार तक्रारी करूनही महापालिका अधिकाऱ्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा सुधारणा दिसत नाही.
“पालिका प्रशासनाने तातडीने आणि प्रभावी सुधारणा केल्या नाहीत, तर महापरिनिर्वाण दिनी वंचित बहुजन आघाडी पालिका अधिकाऱ्यांविरोधात ठोकशाही करण्यास बाध्य होईल,” असा तिखट इशारा वंचितने दिला आहे.

