नागपूर – सततच्या बदल्यांमुळे राज्यभरात चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरमधील भाजप सदस्याने मुंडे यांनी हस्तकाकरवी स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप विधानसभेत करताच सभागृहात एकच खळबळ उडाली, आणि गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
भाजप आमदार कृष्ण खोपडे आणि प्रवीण दटके यांनी आरोप केला की महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना, तुकाराम मुंडे यांनी शासनाने अधिकृत नियुक्ती न देता नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला. सीईओचे अधिकार नसतानाही त्यांनी कोट्यवधींची नियमबाह्य देयके आपल्या पसंतीच्या कंत्राटदारांना केली, आणि सुमारे २० कोटी रुपयांचे पेमेंट्स अशाप्रकारे करण्यात आल्याचा गंभीर आरोप खोपडे यांनी केला.
खोपडे यांनी सांगितले की मुंडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांना धाक दाखवला आणि १७ कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस कारण नसताना निलंबित केले. याहून गंभीर म्हणजे, मुंडे यांच्या समर्थकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आली, असे विधान सभागृहात केल्याने वातावरण आणखी तापले.
खोपडे आणि दटके यांनी तुकाराम मुंडे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, त्यांना ताबडतोब अटक करावी अशी जोरदार मागणी केली.
प्रकरणाची गंभीरता पाहता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र समाधान न झाल्याने आमदार आक्रमक झाले आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. परिणामी तालिका अध्यक्षांना दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.

