उत्तरांवर सदस्यांचे समाधान नाही; अध्यक्ष नार्वेकर यांचे स्पष्ट निर्देश
नागपूर – मुंबई महानगरपालिका शाळांचे खासगीकरण या संवेदनशील मुद्द्यावर आज विधानसभेतील प्रश्नोत्तर तासात जोरदार चर्चा झाली. राज्य मंत्री, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उत्तरांनी सदस्य समाधानी नसल्याने सभागृहात क्षणोक्षणी तणाव वाढला. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदस्यांना स्पष्ट निर्देश देत म्हटले—“उत्तर चुकीचे वाटत असेल तर त्यासंदर्भात योग्य भुमिका घ्यावी.”
मालाडचे आमदार अस्लम शेख यांनी उपप्रश्नातून गंभीर मुद्दा उपस्थित करत सांगितले की, खासगीकरण धोरणांतर्गत चालवल्या जाणाऱ्या मनपा शाळांत शिक्षक पात्रतेचा मोठा प्रश्न आहे. अनेक शिक्षकांकडे कायद्यानुसार आवश्यक शैक्षणिक प्रशिक्षण नाही, तरीही ते उच्च वर्गांना शिकवतात, असे त्यांनी सांगितले.
या मुद्द्यावर राज्यमंत्री प्रथम म्हणाले की शाळांचे खासगीकरण झालेले नाही. मात्र नंतर त्यांनी विषय आपल्या खात्याशी संबंधित नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली. यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मात्र स्वच्छ कबुली दिली की, “यह धोरण मुंबई महानगरपालिकेनेच आणले आहे.” तसेच सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण विषयात दिलेले निकाल अभ्यासून राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्येष्ठ मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मालवणी भागातील पालकांनी केलेले आंदोलन आपल्या हस्तक्षेपामुळे शमले होते, अशी माहिती सभागृहात दिली. कॉंग्रेस सदस्य अमीन पाटील यांनी कोणत्याही संस्थेने पालकत्व (adoption model) घेण्यास विरोध नसल्याचे सांगत, “परंतु टेंडर दिली गेली आहेत, त्याची चौकशी करावी,” अशी मागणी केली.
तरीही राज्यमंत्री मिसाळ यांनी आपली भूमिका बदलली नाही. “ही शाळा खासगीकरण नाहीत,” या भूमिकेवरच त्या ठाम राहिल्या, ज्यामुळे सदस्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली.
शेवटी परिस्थिती बिघडू नये म्हणून अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत सदस्यांना स्पष्टपणे सांगितले—
“उत्तर समाधानकारक नसेल तर पुढील भुमिका घ्या.”

