बाऊन्सर्ससोबत अमानुष पाडकाम?—अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत चौकशी
नागपूर – मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांचे विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि बाऊन्सर्सच्या उपस्थितीत अमानुष पाडकाम झाल्याचा धक्कादायक आरोप आज विधानसभेच्या विशेष बैठकीत करण्यात आला. सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीही या कारवाईवर रोष व्यक्त करत मंत्र्यांना कठोर शब्दांत धारेवर धरले.
शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित करताना सांगितले की, पाडकामाच्या वेळी बाऊन्सर्सनी परिसरातील हिंदू मंदिर बंद केले, रहिवाशांना घरातून सामान बाहेर काढू दिले नाही, आणि संपूर्ण कारवाई मनुष्यत्वाला काळिमा फासणारी होती. “ही सर्व मराठी माणसे, त्यांच्या कुटुंबांची वर्षानुवर्षांची घरे आहेत,” असे सुर्वे भावनिक होत सांगत होते.
त्यांना जोरदार साथ देताना मंत्री मनिषा चौधरी, तसेच ज्येष्ठ विरोधी सदस्य भास्कर जाधव यांनीही पाडकाम प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
यावर प्रतिसाद देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले की, पाडकामाची संपूर्ण कागदपत्रे तपासली जातील, बाऊन्सर्स कोणी नियुक्त केले, कोणाच्या आदेशाने ते आले, याचीही सखोल चौकशी केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत केली जाईल.
सभागृहात पाडकामातील संभाव्य अनियमितता, नागरिकांवरील अमानुष वागणूक आणि विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या आरोपांवरून वातावरण तणावपूर्ण झाले होते.

