राष्ट्रीय ताज्या बातम्या

Satya Nadella: सायबर गुन्ह्यांना व्यापक आळा घालण्यासाठी मायक्रोसॉफ्टकडून ‘महाक्राइमओएस एआय’चे उद्घाटन

भारताच्या एआय-सक्षम सायबर गुन्हेविरोधी लढ्यात महाराष्ट्र आघाडीवर

मुंबई : भारताच्या सायबर गुन्हेविरोधी लढ्यात महाराष्ट्राने महत्त्वाची आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या स्पेशल पर्पज व्हेईकल MARVEL (Maharashtra Advanced Research and Vigilance for Enforcement of Law), मायक्रोसॉफ्ट इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) आणि सायबर आय (CyberEye) यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात आलेल्या ‘महाक्राइमओएस एआय’ या अत्याधुनिक, एआय व अझ्युर-पॉवर्ड प्लॅटफॉर्मचे आज मुंबईत Microsoft AI Tour दरम्यान अनावरण करण्यात आले.

ही घोषणा मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्यातील डिजिटल सुरक्षितता आणि एआय-आधारित प्रशासनाच्या भविष्याबाबत सविस्तर चर्चा केली.

सध्या नागपूरमधील २३ पोलिस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या या प्रणालीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली असून, भविष्यात महाराष्ट्रातील सर्व १,१०० पोलिस ठाण्यांमध्ये ‘महाक्राइमओएस एआय’चा विस्तार करण्याचा प्रस्ताव आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधात पुढील पिढीचे एआय शस्त्र

महाराष्ट्र शासन आणि MARVEL उपक्रमाच्या सहकार्याने मायक्रोसॉफ्टने वाढत्या, अधिक गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी पुढील पिढीच्या एआयचा वापर सुरू केला आहे. ‘महाक्राइमओएस एआय’ची रचना पोलिस अधिकाऱ्यांना एआय-सक्षम साधनांद्वारे अधिक वेगवान, अचूक आणि कार्यक्षम तपास करता यावा, या उद्देशाने करण्यात आली आहे.

राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलनुसार २०२४ मध्ये देशभरात ३.६ दशलक्षांहून अधिक सायबर गुन्ह्यांच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक नवे डिजिटल मानक निर्माण करतो

नैतिक आणि जबाबदार एआय हेच आमचे ध्येय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जनहितासाठी नैतिक आणि जबाबदार एआयचा वापर करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. एआयमध्ये कार्यक्षमता वाढवण्याची, जीवनमान उंचावण्याची आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ करण्याची अपार क्षमता आहे.
MARVEL मागील आमचा दृष्टिकोन असा आहे की, जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करून एआय-सहपायलट्स विकसित करावेत, ज्यातून शासनपद्धतीत मूलभूत परिवर्तन घडवता येईल.
मायक्रोसॉफ्टसोबतचे हे सहकार्य सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांपासून सुरू झाले असले, तरी त्याची क्षमता आरोग्य, शेती, उद्योग आणि प्रशासनापर्यंत विस्तारू शकते. अधिक प्रभावी, नागरिककेंद्री राज्यनिर्मितीसाठी आम्ही या तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करू.”

’महाक्राइमओएस एआय’ची वैशिष्ट्ये

‘महाक्राइमओएस एआय’ हे Microsoft Azure OpenAI Service आणि Microsoft Foundryवर आधारित आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये प्रगत एआय असिस्टंट, ऑटोमेटेड तपास कार्यप्रवाह, सुरक्षित क्लाउड पायाभूत सुविधा, त्वरित केस नोंदणी, बहुभाषिक डेटा विश्लेषण आणि संदर्भाधारित कायदेशीर सहाय्य यांचा समावेश आहे.

एकात्मिक एआय-RAG आणि ओपन-सोर्स इंटेलिजन्सच्या मदतीने हे प्लॅटफॉर्म भारतीय फौजदारी कायद्यांचा संदर्भ घेत तपास अधिक वेगवान आणि अचूक बनवतो. डिजिटल पुरावे तपासणे, गुन्हे शोधणे आणि धोके ओळखून त्वरित प्रतिसाद देणे अधिकाऱ्यांना शक्य होते.

मायक्रोसॉफ्ट IDC ने सायबर आय आणि MARVEL सोबत प्रत्यक्ष पोलिसांच्या गरजांनुसार या प्रणालीची रचना केली आहे.

मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष पुनीत चांडोक म्हणाले, “एआय सार्वजनिक सुरक्षेचे भविष्य नव्याने घडवत आहे. ‘महाक्राइमओएस एआय’मुळे महाराष्ट्रातील प्रत्येक पोलिस अधिकारी अधिक जलद, स्मार्ट आणि सुरक्षित तपास करू शकेल.
आम्ही केवळ तंत्रज्ञान पुरवत नाही, तर नागरिकांचा विश्वास मजबूत करतो आणि भारतासाठी डिजिटल सुरक्षिततेचे नवे मानक उभे करतो.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रस्तावित राज्यव्यापी विस्तारामुळे महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सायबर गुन्ह्यांची डिजिटल नोंदणी, तपास आणि व्यवस्थापन एआय-आधारित प्रमाणित प्रणालीद्वारे करता येणार आहे.

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक आणि MARVEL चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष पोद्दार म्हणाले, “महाक्राइमओएस एआयमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाची संकल्पनाच बदलली आहे. हे मॉडेल केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशात स्वीकारले जाऊ शकते.”

सायबर आयचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी राम गणेश म्हणाले, “मायक्रोसॉफ्ट आणि MARVEL सोबतच्या सहकार्यामुळे दुर्गम भागातही गुंतागुंतीच्या सायबर गुन्ह्यांचा तपास सुलभ होईल. भारतासाठी एक मजबूत डिजिटल ढाल उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

‘महाक्राइमओएस एआय’चे अनावरण हे भारताच्या डिजिटल-सुरक्षित समाजाच्या दृष्टिकोनाकडे टाकलेले निर्णायक पाऊल आहे. मायक्रोसॉफ्ट, महाराष्ट्र शासन, MARVEL, सायबर आय आणि IDC हे सर्व भागीदार जबाबदार एआय, मजबूत कायदा अंमलबजावणी आणि सुरक्षित डिजिटल राष्ट्रनिर्मितीसाठी कटिबद्ध असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे