माजी खासदार सुभाष वानखेडे व आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची मागणी
नांदेड : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानशी संपर्क असल्याचा तसेच हेरगिरीचा आरोप असलेल्या तोतया आयएएस अधिकारी कल्पना भागवत प्रकरणात हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भूमिका काय आहे, याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार सुभाष वानखेडे आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली आहे. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदन देऊन चौकशीची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हदगाव येथे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांकडून कल्पना भागवत हिची चौकशी सुरू असली, तरी या महिलेशी खासदार आष्टीकर यांचे नेमके काय संबंध होते, तसेच या प्रकरणात त्यांचा काही सहभाग आहे का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे वानखेडे यांनी सांगितले.
“तोतया आयएएस अधिकारी असल्याचे उघड होऊनही या महिलेशी खासदारांचे संबंध कसे निर्माण झाले? कोणालाही आर्थिक मदत न करणारे खासदार एवढी मोठी रक्कम कशी देतात? ही रक्कम व्हाईट मनी असेल, तर ब्लॅकमध्ये किती रक्कम दिली गेली असेल, याचाही तपास झाला पाहिजे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या प्रकरणात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत वानखेडे म्हणाले की, “जर हे प्रकरण एखाद्या मुस्लिम खासदाराशी संबंधित असते, तर आतापर्यंत देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला असता. एनआयए, सीबीआय, ईडीसारख्या यंत्रणा ताबडतोब कारवाईस उतरल्या असत्या. मग या प्रकरणात सरकार गप्प का आहे? हा केवळ मतदारसंघाचा नाही, तर देशाचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा प्रश्न आहे.”
आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्या महिलेला ताब्यात घेतल्यानंतर खासदार आष्टीकर दिल्लीला का गेले? सरकार त्यांना पाठीशी का घालत आहे? हा विषय वैयक्तिक किंवा स्थानिक नसून राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे,” असे त्यांनी सांगितले.
भोकर मतदारसंघातील एका रेस्टॉरंटमध्ये संबंधित महिलेच्या वारंवार भेटीगाठी होत असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, आष्टी गावातील कुकर स्फोटाच्या घटनेत जखमींना मदत न केल्याचा आरोप करत, धार्मिक संस्थांना जाहीर केलेल्या मदतीबाबतही प्रश्न उपस्थित केले.
माजी खासदार वानखेडे यांनी पुढे आरोप केला की, “मंदिर बांधणीसाठी आणि त्या महिलेच्या आईच्या उपचारासाठी पैसे दिल्याचे सांगितले जाते. मात्र, गावातील मंदिराचा कळस आजही अपूर्ण आहे. ही महिला थेट हदगावपर्यंत, खासदारांच्या घरापर्यंत कशी पोहोचते, याचा उलगडा झाला पाहिजे.”
या प्रकरणातील जाळे किती देशांपर्यंत पसरले आहे, देशद्रोहाचा काही कट आहे का, याची सखोल चौकशी व्हावी आणि गरज भासल्यास खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना चौकशीसाठी ताब्यात घ्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

