मुंबई ताज्या बातम्या

BMC Elections : मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे भाजपसोबत सन्मानजनक जागावाटप झाले असले, तरी प्रत्यक्ष मैदानात शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था मुंबईत ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’ अशी झाल्याचे चित्र समोर आले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे कुलाब्यातील वॉर्ड क्रमांक २२५.

जागावाटपात हा वॉर्ड भाजपच्या वाट्याला गेल्यानंतर भाजपने राहुल नार्वेकर यांच्या नातेवाईक हर्षिता नार्वेकर यांना उमेदवारी दिली. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी शिंदे गटाने मूळ उद्धव ठाकरे गटातील माजी नगरसेविका सुजाता सानप यांना थेट ‘एबी फॉर्म’ देत निवडणूक रिंगणात उतरवले. या घडामोडीमुळे भाजप नेतृत्वाच्याही भुवया उंचावल्या, आणि दिवसभर हा विषय मुंबईच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला.

‘आयाराम’ प्रवेशामुळे अपेक्षांचा डोंगर

गेल्या वर्षभरात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटातील ‘सिटिंग’ नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षात घेतले, तसेच इतर पक्षांतील माजी नगरसेवकांनाही प्रवेश दिला. परिणामी, या सर्वांची उमेदवारीबाबतची अपेक्षा प्रचंड वाढली. मात्र प्रत्यक्षात भाजपकडून अपेक्षेइतक्या जागा न मिळाल्याने आणि साडेचार ते पाच वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकीत पुन्हा नगरसेवक होण्याची लालसा उफाळून आल्याने, शिंदे गटातील ‘आयारामां’पुढे शिंदेंना मान झुकवावी लागत असल्याचे चित्र मुंबईपुरते स्पष्ट दिसत आहे.

हा प्रकार केवळ दक्षिण मुंबईतील वॉर्ड २२५पुरता मर्यादित नसून, तिकीटवाटपावरून सर्वाधिक असंतोष आणि बंडखोरी शिंदेंच्या शिवसेनेतच होत असल्याचे पावलोपावली जाणवत आहे.

पूर्व उपनगरांत तीव्र पडसाद

या असंतोषाचे सर्वाधिक पडसाद पूर्व उपनगरांमध्ये—घाटकोपर, विक्रोळी, कन्नमवार नगर, भांडुप, मुलुंड—या भागांत उमटत आहेत. तसेच चुनाभट्टी, कुर्ला, माहुल, अणुशक्तीनगर, चेंबूर, मानखुर्द आदी परिसरांत शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था “भीक नको पण कुत्रा आवर” अशी झाल्याची कबुली खुद्द भाजपचे स्थानिक नेतेच नव्हे, तर मोठ्या अपेक्षेने शिंदे गटात गेलेले कार्यकर्तेही खाजगीत देत आहेत, हे विशेष.

फडणवीसांची चारही बाजूंनी कोंडी?

एकंदरीत, मित्रपक्ष भाजपसोबत युतीत महानगरपालिका निवडणूक लढण्याची घोषणा करणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची अप्रत्यक्षपणे कोंडी झाल्याचे चित्र आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी वगळता उर्वरित महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढत आहे.

यामुळे “मुंबई रिजनमध्ये शिंदेंचे काही खरे नाही” अशी खमंग चर्चा सध्या मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज